

ठळक मुद्दे
२०१७च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना 'जैसे थे'
सुधारीत कार्यक्रमानुसार या प्रभागरचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार
प्रभागरचनेतील बदलावरून महायुतीत वादंग निर्माण झाले होते
नाशिक : आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (दि.२२) रात्री उशिरा जाहीर करण्यात आली असून, गत निवडणुकीप्रमाणे २०११च्या लोकसंख्येचा आधार, १२२ सदस्य संख्या, चार सदस्यीय प्रभाग पध्दत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल न झाल्याने २०१७च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना 'जैसे थे' राहिली आहे. चार सदस्यीय २९ तर तीन सदस्यीय दोन अशाप्रकारे पूर्वीप्रमाणेच ३१ प्रभाग अस्तित्वात आले आहेत. विशेष म्हणजे यंदाही १५ व १९ हे प्रभाग तीन सदस्यीय कायम राहिले आहेत. दरम्यान, राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारीत कार्यक्रमानुसार या प्रभागरचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहेत.
ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेसंदर्भातील याचिकांवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायलयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खुला करत चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शासनाच्या नगरविकास विभागाने २०२२ मधील प्रभागरचनेचे आदेश कायम ठेवत, चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचे निर्देश महापालिकांना दिले होते.
त्यानुसार नाशिक महापालिकेने २०१७ च्या निवडणूकीप्रमाणे १२२ सदस्यसंख्या असलेले चार सदस्यीय २९ व तीन सदस्यीय दोन अशा एकूण ३१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करत ५ आॉगस्टला राज्याच्या नगरविकास विभागाला सादर केली होती. त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.22) रात्री उशिरा प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा प्रसिध्द केला. प्रभागरचनेतील बदलावरून महायुतीत वादंग निर्माण झाले होते. नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असल्याने प्रभागरचनेवर शिंदे गटाचे प्राबल्य राहण्याच्या आशंकेने भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रभागरचना जैसे थे राहिल्याने या वादावरही पडदा पडला आहे.
प्रभागरचना तयार करताना २०११च्या लोकसंख्येचा आधार, चार सदस्यीय प्रभाग पध्दत तसेच प्रभागरचना उत्तरेपासून तयार करण्याचे नियम कायम असल्याने नाशिक महापालिकेतील मखमलाबाद परिसर यंदाही प्रभाग क्रमांक १ ठरला आहे. चार सदस्यीय २९ प्रभाग अस्तित्वात आले असून गत प्रभागरचनेनुसार यंदाही प्रभाग क्रमांक १५ व १९ हे दोन प्रभाग तीन सदस्यीय प्रभाग म्हणून अस्तित्वात आले आहेत.
प्रभागरचना तयार करताना लोकसंख्येच्या प्रगणक गटांची जुळवणी करण्यात आली. त्यानुसार प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात आली. यामध्ये सरासरी ४८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग अस्तित्वात आला आहे.
प्रारूप प्रभागरचनेवरील प्राप्त हरकती व सूचनांसाठी २९ आॉगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सुनावणी घेण्यात येणार होती. सुधारीत कार्यक्रमानुसार हरकती व सूचनांसाठी मुदत वाढवून देण्यात आल्याने आता ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी दिली जाणार आहे. या हरकती व सूचनांवर प्राधिकृत अधिकारी संजय खंदारे यांच्यामार्फत ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान सुनावणी दिली जाईल. सुनावणीअंती प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशींचा विचार करून अंतिम प्रभागरचना नगरविकास विभागामार्फत १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान नगरविकास विभागास व १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगास अंतिम प्रभागरचनेचा प्रस्ताव सादर केला जाईल. आयोगाकडून ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिध्द केली जाईल.