Child abduction case : मुंब्र्यातून 3 महिन्यांची अपहृत चिमुकली विसावली मायेच्या कुशीत

1600 सीसीटीव्ही तपासले; 6 दिवस अथक तपास; 3 महिन्यांच्या मुलीचा घेतला शोध; मुंब्रा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
child abduction case
मुंब्र्यातून 3 महिन्यांची अपहृत चिमुकली विसावली मायेच्या कुशीतpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : मुंब्रातून अपहरण झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीला शोधण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी तब्बल सहा दिवस अन रात्र तपास केला. मुंब्रा ते टिटवाळा, मुंब्रा ते वांगणी, मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा रेल्वे मार्गावरील सर्वच स्थानकांचे सुमारे 1600 सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या एका महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. तिच्या चौकशीतुन अपहरण झालेली चिमुकली अकोला जिल्ह्यात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अकोला जिल्ह्यातून तीन महिन्यांच्या चिमुकलीस सुखरूप ताब्यात घेऊन तिला मुंब्रात आणले व तिच्या आईकडे सुपूर्द केले. मुंब्रा पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मुंब्रातील डिसीबी बँकेच्या समोरील रस्त्यावर फरजाना मोहम्मद फिरोज मन्सूरी (23) ही महिला आपल्या दोन मुलींना कडेवर घेऊन रस्ता क्रॉस करीत होत्या. यावेळी दोघांपैकी मोठी मुलगी रडू लागल्याने महिलेची तारांबळ उडाली. याचवेळी रस्त्याने जाणारी एक अनोळखी महिला फरजाना हिच्याकडे आली व तिने छोटी बच्ची को मेरे गोद मे दे दो, मै भी सामने ही जा रही हु असे म्हणत आफिया या तीन महिन्यांच्या मुलीस आपल्याकडे घेतले. मात्र रस्ता क्रॉस करीत असतांनाच अनोळखी महिला तीन महिन्याच्या मुलीस घेऊन फरार झाली.

child abduction case
Railway job scam Dadar : दादरला रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून सोळा लाखांना गंडवले

फरजाना हिने आपल्या मुलीचा खूप शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेरीस फरजाना यांनी या प्रकरणी मुंब्रा पोलिसात फिर्याद दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी फरजाना हिच्या फिर्यादीवरून 22 जानेवारी रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करून चार पथके निर्माण करून त्वरित या गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे फिरवली. मुंब्रा पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चिमुकलीचे अपहरण एका बुरखा परिधान केलेल्या महिलेने केल्याचे दिसून आले. ही महिला एका रिक्षात बसून मुंब्रा स्थानकापर्यंत आल्याचे देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले.

मुंब्रा स्थानक परिसरात अनेक बुरखा परिधान केलेल्या महिला येत जात असल्याने त्यानंतर मात्र ही महिला ओळखणे अवघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मुंब्रा ते वांगणी दरम्यानच्या सर्व स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून बघितले. मात्र कुठेही ही महिला उतरली नसल्याचे दिसले. मुंब्रा पोलिसांनी पुन्हा बारकाईने मुंब्रा स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता एक संशयित महिला गडबडीने मुंब्रा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर येऊन एक पुरुष व एक बुरखा घातलेल्या महिलेशी बोलत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पुरुष व बुरखा घातलेली दुसरी महिला चिमुकलीस घेऊन सीएसएमटी लोकलमध्ये चढल्याचे सीसीटीव्हीत दिसले.

दोघेही मुलीस घेऊन कुठल्या स्टेशनवर उतरले हे शोधण्यासाठी पोलिसांनी ठाणे, नाहूर, भांडुप, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला आदी स्थानकावरील सर्व सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यात सदर पुरुष व महिला मुलीस घेऊन ठाणे स्थानकावर उतरल्याचे दिसून आले. मात्र गर्दीचा फायदा घेऊन बुरखा परिधान केलेल्या महिलेने बाळाचे कापड व स्वतःचा नकाब बदलून पोलिसांना गुंगारा दिला. बाळाच्या कापडाचा व महिलेचा नकाबाचा रंग बदलल्याने पोलिसांना त्यांना शोधणे कठीण झाले.

पोलिसांनी पुन्हा नव्याने या घटनेचा तपास सुरू करून मुंब्रा स्थानकावरील सीसीटीव्ही बारकाईने पडताळले. यावेळी दोघा बुरखाधारी महिलेपैकी एक महिला लोकल मध्ये बसून सीएसएमटीकडे गेल्याचे तर दुसरी महिला मुंब्रा स्थानकासमोरून रिक्षात बसून गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी रिक्षात बसून गेलेल्या बुरखाधारी महिलेचा कसोशीने शोध घेऊन तिला मुंब्राच्या इंशानगर येथून तिला ताब्यात घेतले.

child abduction case
Budget utilization rules : दोन महिने सरकारी खर्चावर मर्यादा!

नसरीन इकलाख शेख असे नाव असलेल्या या महिलेची कसून चौकशी केली असता तिने आपणच बाळ पळवले असल्याचे कबुली देत सदर बाळ अकोला जिल्ह्यातील खेटरी गावात असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर मुंब्रा पोलीस पथक थेट खेटरी गावात पोहचले व त्यांनी अपहरण झालेली मुलगी आफीया हिला मोहम्मद मुजीब गुलाब (31) व त्याची पत्नी खैरूनिसा मुजीब मोहम्मद (30) या दोघांच्या तावडीतून सुखरूप सोडवले. या गुन्ह्यात दोन महिला व एक पुरुष आशा तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

चिमुकलीला पाहताच आईने कवटाळले

अपहरण झालेली चिमुकली आफिया हिस पोलिसांनी सुखरूप मुंब्रात आणून तिला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी तिच्या आईच्या ताब्यात दिले. आपली चिमुकली परत मिळाल्या नंतर तिच्या आईने तीस आपल्या ह्रदयाशी कवटाळून घेतले. तर चिमुकली देखील आपल्या आईच्या कुशीत निवांतपणे विसावली. या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस निरीक्षक शरद कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत व त्यांच्या पथकाने सहा दिवस अहोरात्र मेहनत घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news