

मुंबई : भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी नोकरी भरती सुरू असल्याची बतावणी करून रेल्वेत नोकरीच्या आमिषाने एकाची सुमारे सोळा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ब्रिजमोहन शंकरलाल मराठे या आरोपीविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
33 वर्षांचे तक्रारदार प्रभादेवी येथे राहत असून एका खासगी कंपनीत कामाला आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत त्यांची ब्रिजमोहनशी ओळख झाली. भारतीय सेवेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे त्याने सांगितले होते. रेल्वेत विविध पदासाठी नोकरी भरती होणार असून त्यांना रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखविले होते.
याच नोकरीसाठी त्याने त्यांच्याकडून नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत टप्याटप्याने ऑनलाईन आणि रोख स्वरुपात सोळा लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांना नोकरी दिली नाही. नोकरीविषयी विचारणा केल्यानंतर तो त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी नोकरीचा विषय सोडून दिला आणि त्याच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या सोळा लाखांची मागणी केली होती, मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी शिवाजी पार्क पोलिसांत ब्रिजमोहन मराठे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.