

ठाणे: बनावट जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आलेल्या ‘कैसा हराया’ फेम सहर शेख हिच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार असताना सध्या त्या ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, अडचणींचे सावट गडद झाले असतानाच फोन स्वीच ऑफ, घर लॉक करून त्या व त्यांचे वडील युनूस शेख मुंब्य्रामधून गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 ब मधून एमआयएम पक्षाच्या सहर युनूस शेख यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर मात करीत विजय मिळवला होता.
महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर तक्रारदार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी आक्षेप घेतले आहेत. हे प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवण्यात आल्याचा आरोप
करण्यात आला आहे. या प्रकरणी जातवैधता पडताळणी समितीकडून चौकशी सुरू असून याबाबतचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर शेख कुटुंबाने कमालीची गुप्तता पाळल्याने संशय अधिकच बळावत चालला आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस हे गेल्या काही दिवसांपासून केवळ माध्यमांपासूनच नव्हे तर मुंब्रा परिसरातूनही ‘गायब’ असल्याची चर्चा आहे. पत्रकारांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन उचलले जात नसून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे.