

Mumbai Railway Accident Mayur Shah Death
मुंबई : 44 वर्षांच्या मयूर सोमवारी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी घरून निघाला... ऑफिसला जाण्यापूर्वी मयूरनं डोंबिवलीला जे घर खरेदी करायचं होतं त्याची बोलणी करायला जायचं ठरवलं... पण हा शेवटचा लोकल प्रवास असेल असं त्या मयूरला स्वप्नातही वाटत नव्हतं. कसाराकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेनमधून प्रवास करत असताना मयूर दरवाज्याजवळच होता... मुंब्रा स्थानकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशाचा धक्का लागल्याने मयूर खाली पडला आणि मृत्यू झाला. मयूर ही कुटुंबातील एकुलती कमावती व्यक्ती होती आणि त्याची आई ही 87 वर्षांची आहे. या घटनेनं ठाण्यात शोककळा पसरली आहे.
ठाण्यातील तुळशीधाम येथील ग्रीनवुड पार्क येथे मयूर शहा आणि त्याची आई राहतात. मयूर हा 44 वर्षांचा आयटी अभियंता होता. विद्याविहारमधील कंपनीत तो कामाला होता. मयूरला दोन बहिणी असून दोन्ही बहिणींचं लग्न झालंय. तर मयूर हा अविवाहित असून वयोवृद्ध आईसोबत तो राहत होता. त्याच्या वडिलांचे 22 वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
मयूरचा डोंबिवलीत फ्लॅट खरेदीचा व्यवहार सुरू होता. मंगळवारी फ्लॅटमालकाने त्याला बोलवून घेतले होते. मयूर विद्याविहारला ऑफिसला जाण्यापूर्वी डोंबिवलीला जाण्यासाठी निघाला. मयूरने ठाण्यावरून कसारा फास्ट लोकल पकडली. गर्दीमुळे मयूर दरवाज्याजवळच थांबला असावा. मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी जे 10 प्रवासी लोकल ट्रेनमधून पडले त्यात मयूरचाही समावेश होता. मयूरचा या अपघातात मृत्यू झाला.
मयूरच्या बहिणींना या अपघाताची माहिती समजताच त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात धाव घेतली. तर मयूरच्या आईला दुपारपर्यंत मुलाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती. त्यांचे वय जास्त असल्याने अजून मयूरच्या मृत्यूबाबत सांगितलं नाही, अशी माहिती मयूरचे मेव्हणे संतोष दोशी यांनी दिली.
23 वर्षांच्या केतनचा मृत्यू
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या केतन सरोज (वय 23) या तरुणाचाही मुंब्राजवळील रेल्वे अपघातात मृत्यू झाला. केतन हा तीन महिन्यांपूर्वीच ठाण्यातील एका कॉल सेंटरमध्ये नोकरीला लागला होता. केतन हा अविवाहित होता. सोमवारी सकाळी कामावर जात असताना त्याचाही मृत्यू झाला. केतनला दोन लहान भाऊ असून त्यांना सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी सरोज कुटुंबाने केलीये.