

Woman beaten up in Ambernath CSMT Local Train
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशाला एका पुरुष प्रवाशाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीएसएमटीहून अंबरनाथला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.
सीएसएमटीहून अंबरनाथच्या दिशेने येणाऱ्या या लोकलमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात सर्वसामान्य प्रवासी प्रवास करत असल्याच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या संदर्भात रेल्वेने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र एका महिलेला दिव्याग्यांच्या डब्यात एक प्रवासी मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर प्रवाशाने या महिलेला डब्यातच मारहाण करायला सुरुवात केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. इतर प्रवासी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तो कोणाचेही न ऐकता त्या महिलेला मारहाण करताना दिसतोय. 'तू मला आईवरून शिवी का दिली', असं म्हणत पुरुष प्रवाशाने महिलेला बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसते. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे हा व्हिडिओ गेला असून संबंधित प्रकरणाची सत्यता पडताळून कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.