

भाईंदर: अरबी समुद्रातील मुंबई हाय परिसरात ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) कंपनीचा निर्मनुष्य प्लॅटफॉर्म जीपीएस पोजिशनवर उभारण्यात आला आहे. मात्र या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारची लाईट व सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे टाळण्यासाठी त्यावर लाईट व सुरक्षा व्यवस्थेची गरज निर्माण झाल्याचे पत्र पाली-उत्तन मच्छीमार सहकारी सोसायटीचे संस्थापक बर्नड डिमेलो यांनी पालघर-ठाणे मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.
अरबी समुद्रातील मुंबई हाय या तेल विहिरीच्या परिसरात 19अंश4 2.327 एन व 71अंश 55.765ई या पोजिशनवर ओएनजीसी या सरकारी कंपनीचा निर्मनुष्य जीपीएस प्लॅटफॉर्म टॉवर उभारण्यात आला आहे.
या टॉवरवर कोणत्याही प्रकारची लाईट, इशारा देणारे दिवे (वॉर्निंग लाईट), रेडियम मार्किंग अथवा इतर कोणतीही सागरी सुरक्षा व्यवस्था कार्यरत नसल्याचे दिसून आल्याचे बर्नड यांनी सांगितले. यामुळे रात्रीच्या वेळी येथून जलवाहतूक करणाऱ्या नौकांना, बोटींना अपघात होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. या संभाव्य अपघातामुळे मोठी जिवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
7 मे रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास उत्तनच्या डोंगरी-चौक येथील नोंदणी क्रमांक एमआय-0000एमएफव्ही असलेली प्रेषित नामक मासेमारी नौका मासेमारी करून किनाऱ्याकडे परत येत होती. त्यावेळी त्या नौकेतील तांडेल व मच्छीमारांना तेथील जीपीएस प्लॅटफॉर्म टॉवर निदर्शनास न आल्याने नौका त्या टॉवरच्या अत्यंत जवळ येऊन पोहोचली. यावेळी नौकेचे तांडेल संजाव इतूर यांनी वेळीच प्रसंगावधान राखून तात्काळ नौकेची दिशा बदलली. यामुळे नौका व जीपीएस टॉवरचा मोठा अपघात टळला.
मात्र या घटनेमुळे नौकेवरील खलाशी भयभीत झाले असन भविष्यात अशा प्रकारची गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बर्नड यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाणे-पालघर मत्स्यव्यवसाय विभागामार्फत त्या निर्मनुष्य जीपीएस प्लॅटफॉर्म टॉवरची तात्काळ पाहणी करून त्यावर सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी या विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
त्यात टॉवरवर उच्च क्षमतेचे लाईट तसेच इशारा देणारे दिवे बसवून ते तात्काळ सुरू करावेत, टॉवरच्या प्लॅटफॉर्मवर रेडियम व रिफ्लेक्टर मार्किंग करावे, सागरी सुरक्षेसाठी आवश्यक इशारा फलक लावावेत, रात्रीच्यावेळी नौकांना प्लॅटफॉर्म सहज दिसेल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, आदी उपाययोजना करण्याची मागणी बर्नड यांनी पत्राद्वारे केली असून यामुळे संभाव्य अपघात टाळणे शक्य होईल, असा दावा त्यांनी केला आहे.