Local Train : मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावर धावणार नव्या एसी लोकल
ठाणे : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या नवीन वर्षात तांत्रिक आणि आधुनिक प्रकारच्या एसी लोकल सेवा धावणार, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने माध्यमांशी बोलताना जाहीर केली आहे. तसेच या नव्या वातानुकूलित लोकल सेवांमध्ये प्रवाशांसाठी अधिक आसने आणि उभे राहण्यासाठी जागेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर या वातानुकूलित लोकल सेवांच्या सुलभ आणि सहज प्रवासाकरिता व लोकल रेल्वे सेवांच्या निर्धारित वाहतुकीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर डिसेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत नवीन उपाययोजना करण्यात येणार आहेत.
नव्या अंडरस्लंग वातानुकूलित लोकल सेवा चेन्नई येथील इंटिग्रल कोच (आयसीएफ) कारखान्यातून मुंबईमध्ये रवाना केल्या जाणार आहेत. सध्या त्या एसी लोकल सेवा विल्लीवाक्क्म कारशेडमध्ये यार्डमध्ये आहेत. मात्र एसी लोकल सेवा मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गांवर कोणत्या तारखेपर्यंत धावणार हे अद्यापही अस्प्ष्टच आहे. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावर नव्या वातानुकूलित लोकल सेवेच्या दर दिवशी तब्बल 7 फेर्या नियोजित करण्यात येणार व काळानुसार वाढवण्यात येणार आहेत व पश्चिम रेल्वेमार्गावर दर दिवशी 10 फेर्या प्रवास करतील. अलीकडे मध्य रेल्वे मार्गावर 90 वातानुकूलित लोकल रेल्वे सेवा आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर 109 वातानुकूलित लोकल सेवा प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध आहेत.
1,116 आसन उपलब्ध
या अंडरस्लंग मेधा वातानुकूलित लोकल सेवांमध्ये विद्युत प्रणालीसारखी उपकरणे कोचच्या आत ठेवण्याऐवजी कोचच्या मजल्याखाली ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे या डब्यात अधिकाधिक जागा उरत असल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठी आणि अधिक अतिरिक्त आसनक्षमता उपलब्ध असणार आहे.

