

उरण ः राजकुमार भगत
रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या पोर्ट लाईन मार्गावरील उपनगरीय सेवा वाढवण्याच्या आणि दोन नवीन स्टेशनांना थांबा देण्याच्या प्रस्तावाला नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे नेरूळ-उरण आणि बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या 25 डिसेंबरला नवीमुंबई विमानतळावरून विमान सेवा सूरू होणार आहे, त्यापुर्वी तरघर आणि गव्हाण या दोन रेल्वेस्थानकांवर थांबा आणि 10 आणखी लोकल फेऱ्या नव्याने सुरू होण्याची शक्यता रेल्वेच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे आमदार महेश बादली यांनी पाठपुरावा केला होता.
उरण पोर्ट लाईनवर नवीन 10 लोकल सेवा सुरू होणार असून नेरूळ-उरण-नेरूळ 04 फेऱ्या आणि बेलापूर-उरण-बेलापूर 06 फेऱ्या आणि तरघर आणि गव्हाण या पोर्ट लाईनवरील उपनगरीय रेल्वे स्टेशनांना लोकल थांब्याची सुविधा देण्यात येणार आहे. नेरूळ-उरण आणि बेलापूर-उरण विभागातील पोर्ट लाईनवरील लोकल सेवांची गती वाढवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. हे बदल लवकरच लागू करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. यासंबंधीची सूचना तातडीने जारी करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
तरघर आणि गव्हाण ही दोन्ही स्टेशन्स नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगाने विकसित होत असलेल्या उलवे नोड परिसरात आणि नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ आहेत. हा उलवे नोड बेलापूर आणि नेरूळच्या पुढे उरणकडे जाणाऱ्या पोर्ट लाईनवर आहे. तरघर आणि गव्हाण स्टेशनांना लोकल थांब्याची मंजुरी मिळणे, हा उलवे परिसरातील रहिवाशांसाठी सर्वात मोठा फायदा आहे. उलवे हा सिडकोने विकसित केलेला एक विशाल आणि सुनियोजित परिसर आहे, जिथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत आणि हजारो लोक स्थायिक होत आहेत.
या दोन्ही स्टेशनवर लोकल थांबल्यामुळे, उलवे नोडमधील रहिवाशांना थेट सीबीडी बेलापूर, नेरूळ आणि पुढे ट्रान्स-हार्बर मार्गे ठाणे वा मुंबईकडे जाण्यासाठी जलद आणि थेट पर्याय उपलब्ध होईल. उलवे नोड हा नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर, या भागातील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढेल.
या स्टेशन्सवरील लोकल थांब्यांमुळे विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी तसेच प्रवाशांसाठी वाहतुकीचा एक महत्त्वाचा दुवा तयार होईल. उलवे नोडच्या जवळ अनेक शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संकुले विकसित होत आहेत. या स्टेशन्सवर सेवा सुरू झाल्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्यांना आणि शिकायला जाणाऱ्यांना मोठा फायदा होईल.
रेल्वे मंत्रालयाचा हा निर्णय उलवे नोडला उपनगरीय रेल्वे नेटवर्कशी अधिक कार्यक्षमतेने जोडून नवी मुंबईच्या भविष्यातील विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मध्य रेल्वेने अद्याप या नवीन सेवांचे अधिकृत आणि संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेले नाही. रेल्वे बोर्डाने 3 डिसेंबर 2025 रोजी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि मध्य रेल्वेला हे बदल लवकरच सोयीस्कर तारखेपासून लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मध्य रेल्वेने हे बदल अति-तातडीचे म्हणून घोषित केले आहेत आणि हे नवीन वेळापत्रक डिसेंबर 2025 अखेरीस कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.