

कसारा : जेवणातून पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष देऊन ठार मारणाऱ्या आईला पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास अटक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातील तळेपाडा येथे घडली आहे. काव्या (वय १० वर्षे), दिव्या (वय ८ वर्षे) आणि गार्गी भेरे (वय ५ वर्षे) अशी तीनही मृत मुलींची नावे आहेत. शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत संध्या संदीप भेरे असे अटक केलेल्या आईच नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर शहरालगत असलेल्या चेरपोली गावातील संदीप भेरे यांची पत्नी संध्या ३ मुलींसह गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्यातील अस्नोली येथे तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी २१ जुलै रोजी काव्या, दिव्या आणि गार्गी या तिघींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने मुलींच्या आईने अस्नोली येथील खाजगी डॉक्टरकडे त्यांना नेले व नंतर शहापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक बनल्याने दोघींना मुंबईच्या नायर रुग्णालयात तर एकीला घोटी जवळील धामणगाव येथील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असताना तिघींवर काळाने झडप घातली. यापैकी नायर रुग्णालयात दाखल काव्या हीचा मृत्यू गुरुवारी (ता.२४) रात्री तर दिव्या हिचा मृत्यू शुक्रवारी (ता.२५) सकाळी झाला. तसेच एसएमबीटी रुग्णालयात दाखल गार्गी हिचा मृत्यू गुरुवारी (ता.२४) रात्री झाल्याचे सांगण्यात आले . या धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजून चर्चांना उधाण आले असून विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
याप्रकरणी २५ जुलै रोजी किन्हवली पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यावेळचं नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने तिन्ही मुलीचे मृतदेह शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तिन्ही मुलींची कीटकनाशक विष जेवणात (डाळ भात ) मध्ये कालवून दिल्यानं तिघांचा मृत झाल्याची माहिती किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली.