

कसारा : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून एक मन सुन्न करणारी आणि अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. तालुक्यातील अस्नोली गावातील तळेपाडा येथे अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून तीन सख्ख्या बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने प्रकरणाला एक गंभीर वळण लागले आहे.
काव्या संदीप भेरे (वय १०), दिव्या संदीप भेरे (वय ८) आणि गार्गी संदीप भेरे (वय ५) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्या बहिणींची नावे आहेत. एकाच कुटुंबातील तीन मुलींच्या मृत्यूने भेरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे शहापूरजवळील चेरपोली गावचे रहिवासी असलेले संदीप भेरे यांच्या पत्नी संध्या या आपल्या तीन मुलींसह गेल्या आठ महिन्यांपासून अस्नोली येथील माहेरी राहत होत्या. तिन्ही मुलींना, काव्या, दिव्या आणि गार्गी यांना अचानक पोटदुखी आणि उलट्यांचा तीव्र त्रास सुरू झाला. त्यांच्या आईने तातडीने त्यांना अस्नोली येथील एका खाजगी डॉक्टरकडे नेले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघींचीही प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी तातडीने हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. काव्या आणि दिव्या यांना मुंबईतील नायर रुग्णालयात, तर सर्वात लहान असलेल्या गार्गीला घोटीजवळील धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या तिन्ही बहिणींची प्राणज्योत अखेर मालवली. गुरुवारी (दि. २४) नायर रुग्णालयात काव्या भेरे हिचा रात्री मृत्यू झाला. त्याच रात्री एसएमबीटी रुग्णालयात गार्गी भेरे हिनेही अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी (दि. २५) सकाळी नायर रुग्णालयात दिव्या भेरे हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेनंतर किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, मुलींच्या नातेवाईकांनी हा केवळ अन्नातून विषबाधेचा प्रकार नसून घातपात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे पोलीस आता सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रथमदर्शनी ही अन्नातून विषबाधेची घटना वाटत असली तरी, नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. तिन्ही मुलींच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल," अशी माहिती किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली. एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने अस्नोली गावावर शोककळा पसरली आहे. आता पोलीस तपासात आणि शवविच्छेदन अहवालात काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.