

उल्हासनगर : वालधुनी नदीच्या तीरावर लघुशंकेसाठी गेलेल्या वृद्धाचा तोल जाऊन नदीत पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२५) सकाळी उल्हासनगर मध्ये घडली. शशिकांत एनकुळे (वय ५८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शशिकांत एनकुळे हे उल्हासनगर कॅम्प ३ मधील आशीर्वाद सोसायटीतील रहिवासी आहेत. ते सकाळी वालधुनी नदीच्या किनारी फिरायला आले होते. तेथे लघुशंकेसाठी थांबले असता पाय घसरून ते नदीत पडले. पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दल, तसेच समाजसेवक शिवाजी रगडे यांना संपर्क करून मदतीसाठी बोलावले. बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होत शोधकार्य सुरू करत त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.