भिस्त

Monsoon Preparation Indian Households
भिस्तpudhari photo
Published on
Updated on

प्रा. सुहास बारटक्के

उन्हाळ्यात आम्ही घरी अन्नधान्य, पापड, सांडगे वाळवून त्याचा साठा करून ठेवतो. एकदा पाऊस धबाधबा कोसळू लागला की, मार्केटचं काही खरं नसतं. वस्तूंना बुरशीही पटकन येते म्हणून ही पावसाळी बेगमी. भविष्याची काळजी. अगदी दारातल्या झाडावरचे काही फणसही मी मुद्दाम पावसाळ्यासाठी राखून ठेवतो. भुकेल्या पक्ष्यांना, खारींना ते पावसाळ्यात उपयोगी पडतात. परवा झाडावरून भाजीसाठी फणस काढत होतो, तर दारात शेजारच्या इमारतीच्या कामावर मजुरी करणारा मुलगा हजर झाला. साहेब भाजीसाठी मलाही एक फणस द्या, नाहीतर 10 रुपये उसने द्या.

“काय रे किती पगार देतो तुला तो कंत्राटदार?”

“शंभर रुपये रोज.” “मग किती उरतात त्यातले? बचत करतोस की नाही?”

“कसलं हो, सगळे संपतात. सुट्टीचा पगार पण नसतो.”

तो दारू पिऊन बडबडत जाताना मी त्याला पाहिलं होतं; तरी मी त्याला कटवण्यासाठी 10 रुपये दिले. आणि थोडे पैसे राखून ठेवावेत असं लेक्चरही दिलं, झाला... चार दिवसांनी त्याचा तो सेंटरिंगचं लोखंडी सळ्या बांधण्याचं काम करणारा कंत्राटदार दारात हजर. “साहेब माझ्या माणसाला परवा तुम्ही मदत केलीत त्याबद्दल आभार मानायला आलोय्‌‍ म्हणत त्यानं हळूच आपल्या अडचणींचा पाढा वाचला.” “मला मोठ्या ठेकेदाराकडून बिल मिळायचंय्‌‍ तोपर्यंत 500 रुपये उसने द्या,” म्हणत खनपटीला बसला.

Monsoon Preparation Indian Households
Janakavi P Savlaram : पी. सावळाराम आणि ठाणे

मी नाही म्हणत भिडेखातर अखेर त्याला पैसे दिलेच. त्यासाठी त्यानं त्याची सेंटरिंगची हत्यारंच माझ्या दारात आणून ठेवली. पुढे त्यानंच ती येऊन हळूच परत नेली व माझे पैसेही बुडवले. या दोन प्रसंगातून बोध घेतो तर आठ दहा दिवसांनी माझा एक श्रीमंत बिल्डर मित्र गाडी घेऊन दारात हजर झाला. जरा दहा हजार रुपये उसने दे, नंतर देतो अशी सुरुवातच करत तो बोलू लागला तेव्हा मला आश्चर्यच वाटलं. बैठकीत दारू पार्टीसाठी पाच पाच हजार रुपये उडवणारा हा मित्र इतका पैशाच्या अडचणीत आलेला बघून धक्काच बसला.

“अरे, काळजी करू नकोस, त्या कामाचं पेमेंट मार्च एंडिंगमुळे अडलंय. ते मिळालं की तुझे पैसे लगेच मिळतील.” तो. मला आश्चर्यच वाटलं. म्हणजे तू साठवण, बचत वगैरे करत नाहीस ? मी. “वेळ कुणाला असतो. एरवी घरात पैसा असतो. बाजारात जाऊन हवं ते आणायचं झालं.” तो म्हणाला. तेव्हा मी त्याला मागे बिल्डिंगच्या वळणीला केलेलं खारीचं घरटं दाखवलं. बांधातलं उंदराचं बिळही दाखवलं. त्यातले अन्नाचे साठे दाखवले. हे बघ ही त्यांची पावसाळ्याची बेगमी.

Monsoon Preparation Indian Households
Konkan Politics : तटकरे, राणेंच्या नेतृत्वाला धुमारे!

लादी उचकटून मुंग्यांनी केलेला अन्नसाठा दाखवला पण, आपण खूप हुशार आहोत, अशा आविर्भावात त्याला म्हटलं, “जर हे छोटे प्राणी भविष्याची काळजी करून हा अन्नसाठा करून ठेवतात, तर तुला ही काळजी का नाही? त्यावर तो म्हणाला, अरे, तुझ्यासारखी माणसं समाजात आहेत म्हणून आमची काळजी तुमच्यावर सोपवलीय” खरंच आपल्या भिडस्तपणाचा फायदा घेऊन कुणी आपल्याला सतत मूर्ख बनवत असेल तर केव्हातरी कठोर व्हायलाच हवं नाही का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news