

डॉ. महेश केळुसकर
पी. सावळाराम यांनी आपल्या वयाची 81 वर्ष पूर्ण केली तेव्हा ते निमित्त साधून ज्ञानसाधना महाविद्यालयाने 1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार केला. त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी ज्ञानसाधनातर्फे जनकवी पी. सावळाराम गौरव ग्रंथ काढण्यात आला. त्या ग्रंथाचं संपादन सावळारामांचे शिक्षणक्षेत्रातले स्नेही ठाण्याचे डॉ. दाऊद दळवी यांनी केलं. सावळारामांचं व्यक्तिमत्व फक्त जनकवी म्हणूनच नव्हे तर बहुआयामी कलावंत म्हणूनही उठून दिसतं. तमाशा, लोकनाट्य, चित्रपट, आकाशवाणी आणि साहित्य या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या प्रतिभेची स्वतंत्र छाप टाकली. त्यांच्या विविध कलाविष्कारांचा आणि सामाजिक जाणिवेनं प्रेरित साहित्य निर्मितीचा महाराष्ट्राने यथोचित गौरव केला.
कविसंमेलनं तर नित्यनेमानं अनेक गावांमधून, शहरांमधून होत असतात. पण, गीतकारांची संमेलनं त्या तुलनेमध्ये क्वचितच होतात. अलीकडेच ठाणे महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झालेल्या शर्मिला पिंपोळकर यांनी मनावर घेतलं तर ठाणे शहरामध्ये महापालिकेतर्फे राज्यस्तरावर गीतकारांचं मोठं संमेलन घेता येईल आणि त्यानिमित्तानं ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष पी. सावळाराम यांच्या स्मृतींना उजाळाही देता येईल.
पी. सावळाराम हे मूळचे सांगलीचे. 1944 मध्ये ते ठाण्यात स्थायिक झाले. त्यांच्या ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक जीवनाची खरी सुरुवात 1960 मध्ये झाली. साहित्यिक मित्र नी. गो. पंडितराव यांनी आग्रह करून 1962 सालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सावळारामांना पहिल्यांदा उभं केलं. ते निवडूनही आले. सावळारामांसारखा पदवीधर, सुशिक्षित आणि साहित्यिक नगरसेवक मिळाल्यामुळे 1963 साली त्यांची शिक्षण समितीचे सभापती म्हणून निवड झाली.
सभापती झाल्यावर त्यांनी त्वरित शिक्षकांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. 1965 साली त्यांची नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता. 30 जून 1966 रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. अपक्ष सावळाराम विरुद्ध त्यांचे मित्र कम्युनिस्ट पक्षाचे गुणाकार जोशी उभे होते. सावळारामांना 33 मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला. ते ठाण्याचे पहिले गीतकार नगराध्यक्ष झाले. आचार्य अत्रे, ग. दि. माडगूळकर अशा दिग्गजांनी त्यांचं अभिनंदन केलं.
सावळाराम नगराध्यक्ष असताना ठाणे पालिकेचं बजेट अतिशय तुटपुंज होतं तरीही सावळाराम यांनी ठाण्यासाठी एक स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आणि ड्रेनेज योजना मार्गी लावली. त्यांची कारकीर्द एक वर्षाची होती. या काळात त्यांनी सुमारे 1000 प्लॅन पास केले. सावळाराम अत्यंत नि:स्पृह आणि निरीच्छ होते. अनेक बड्या राजकीय नेत्यांशी मैत्री असूनही त्यांनी कधीच स्वतःसाठी तिचा फायदा घेतला नाही. सार्वजनिक क्षेत्रात ते कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहिले.
नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द जनतेच्या सेवेत अत्यंत चोखपणे घालून मुदत संपल्यावर सावळाराम अत्यंत समाधानाने पायउतार झाले . 1967 साली त्यांनी राजकारणामधून निवृत्ती घेतली. नगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यावर समस्त ठाणेकरांनी या मावळत्या दिनकरला सत्काराचे अर्घ्य देऊन कृतज्ञता व्यक्त केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या हस्ते हा हृद्य सत्कार ठाणेकरांच्या वतीने केल्यामुळे सावळाराम भारावून गेले. 1944 साली सावळाराम, त्यांची पत्नी सुनंदाबाई आणि 4 महिन्यांची मुलगी प्रतिभा यांच्या सह ठाणे येथे संताजी शिबिरात राहायला आले.
ठाण्यालाच त्यांच्या संसाराची सुरुवात झाली. प्रतिभाच्या पाठीवर कल्पनाचा जन्म झाला. संजय, राजीव ही त्यांची दोन पुत्ररत्नं. सावळारामांच्या मुलांना वडिलांच्या गीतलेखनाचा खूप अभिमान! त्यांना सावळारामांची गीतं तोंडपाठ असायची. त्यांच्या घरी आशा भोसले, लता मंगेशकर, रमेश देव, सीमा, सुलोचना चव्हाण अशी सिनेमातील अनेक मोठी माणसं येत. त्यांना पाहण्यास ठाणेकरांची अलोट गर्दी जमत असे. पावणे सहा फूट उंच, भावपूर्ण डोळे, गहू वर्ण आणि हसतमुख चेहऱ्यामुळे सावळारामांचं व्यक्तिमत्व प्रसन्न वाटायचं. त्यांचा अतिशय साधा पोशाख असे.
कोल्हापुरी बाजाची त्यांची मराठी भाषा होती. गप्पा मारण्याचा त्यांना नाद होता. अख्खं ठाणे शहर त्यांना ओळखत असे. सावळाराम जगन्मित्र होते. निवृत्तीनंतर सावळारामांचा दिवस त्यांच्या ठरलेल्या शिस्तीनं सुरू होई. सकाळी सातला उठून ते चहा घेत. वर्तमानपत्र वाचत. नवीन वाचनासाठी पुस्तकं शोधणं हे त्यांचं आवडतं काम होतं. संध्याकाळी ते चालत गडकरी रंगायतनपर्यंत फिरायला जात. रस्त्यातले बुक स्टॉल हे त्यांचं नेहमीचं थांबण्याचं ठिकाण असे. रात्री जेवणानंतर ते कट्ट्यावर सर्वांबरोबर गप्पा मारत. घरी परतल्यावर श्रीराम जय रामचा मुखी जप करत निवांत झोपत. या सर्व दिनक्रमात त्यांची सून गीता त्यांची तब्येत सांभाळत असे.
सावळारामानी वयाची 81 वर्ष पूर्ण केली तेव्हा ते निमित्त साधून ज्ञानसाधना महाविद्यालयाने 1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार केला. त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी ज्ञानसाधनातर्फे जनकवी पी. सावळाराम गौरव ग्रंथ काढण्यात आला. त्या ग्रंथाचं संपादन सावळारामांचे शिक्षणक्षेत्रातले स्नेही ठाण्याचे डॉ. दाऊद दळवी यांनी केलं. सावळारामांचं व्यक्तिमत्व फक्त जनकवी म्हणूनच नव्हे तर बहुआयामी कलावंत म्हणूनही उठून दिसतं. तमाशा, लोकनाट्य, चित्रपट, आकाशवाणी आणि साहित्य या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपल्या प्रतिभेची स्वतंत्र छाप टाकली. त्यांच्या विविध कलाविष्कारांचा आणि सामाजिक जाणिवेनं प्रेरित साहित्य निर्मितीचा महाराष्ट्राने यथोचित गौरव केला.
7 मे 1960 रोजी ठाणे येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. रा. श्री. जोग यांची निवड झाली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष वामनराव ओक होते. पी. सावळाराम यांना या संमेलनाचे कार्योपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. या संमेलनाची सुरुवात सावळाराम यांनी लिहिलेल्या सारस्वत मंदिरात माझी मराठी आज येत... जय विजयाची सुमने उधळीत.. बोला सुस्वागत सुस्वागत... या स्वागत गीतानं झाली होती.
संमेलनानिमित्त अनेक कवींच्या कवितांचा कोरीव लेणी नावाचा प्रातिनिधीक कविता संग्रह प्रकाशित केला. त्याच्या संपादक मंडळात सावळारामांचा समावेश होता. पुढे 1988 साली ठाणे येथे पुन्हा झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातही सावळारामांचा सहभाग होता. या संमेलनात होणाऱ्या कविसंमेलनाचे अध्यक्ष व सूत्रसंचालक म्हणून त्यांची निवड झाली होती. एका मोठ्या जनकवीच्या स्मरणार्थ त्यांचं भव्य शिल्प ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर लागलं पाहिजे, अशी सांस्कृतिक ठाणेकरांची रास्त मागणी आहे.