Monsoon Fishing Ban | मच्छीमारांनो सावधान! 1 जूनपासून समुद्रात मासेमारीला अधिकृत बंदी; 31 मेपूर्वीच नौका बंदरात परतण्याचे आदेश

Monsoon Fishing Ban | १ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई
Fishing Ban
Fishing Ban file photo
Published on
Updated on
Summary
  1. १ जून ते ३१ जुलैदरम्यान पावसाळी मासेमारीवर बंदी

  2. मासळीच्या प्रजोत्पादनासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय

  3. सर्व यांत्रिक आणि यंत्रचलित नौकांवर बंदी लागू

  4. नियम मोडणाऱ्यांवर नौका जप्तीसह कठोर कारवाई

  5. अपघात झाल्यास शासनाकडून नुकसानभरपाई मिळणार नाही

समुद्रातील मासळीच्या साठ्याचे संवर्धन आणि पावसाळ्यातील वादळी हवामानामुळे मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी राज्य शासनाने यंदाही पावसाळी मासेमारीवर बंदी लागू केली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ही बंदी लागू राहणार असल्याची माहिती ठाणे-पालघर जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) दिनेश पाटील यांनी दिली.

Fishing Ban
Zurale Gopinath Temple | परळीत 300 वर्षांपूर्वीचे ‘झुरळे गोपीनाथ’ मंदिर; झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास असल्याची श्रद्धा

दरवर्षी पावसाळ्याच्या काळात समुद्रातील अनेक माशांचा प्रजोत्पादन कालावधी सुरू असतो. त्यामुळे या काळात मासेमारी थांबवल्यास मासळीच्या बीज निर्मितीस मोठी मदत होते आणि समुद्रातील मासळीचा साठा वाढण्यास हातभार लागतो. पर्यावरण संतुलन आणि मत्स्यसंपत्ती जतन करण्याच्या दृष्टीने ही बंदी महत्त्वाची मानली जाते.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार, ही बंदी सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना लागू असणार आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.

सध्या समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी ३१ मेपूर्वी आपल्या बंदरांमध्ये परतणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ जून किंवा त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरांवर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांच्या बाहेर खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व मच्छीमार सहकारी संस्था आणि नौकामालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Fishing Ban
Dhule Crime News | धुळे-मोहाडी पोलिसांची धडक कारवाई; चड्डी बनियान गँगचा मुख्य सूत्रधार जेरबंद

बंदीच्या काळात एखादी यांत्रिक नौका बेकायदेशीर मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत संबंधित नौका, मासेमारी साहित्य आणि पकडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे. तसेच संबंधित मालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

याशिवाय, बंदीच्या काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास अशा नौकेला शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व मच्छीमारांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news