

प्रा. रवींद्र जोशी
परळी वैजनाथ : कॉकरोच जनता पार्टीची सध्या चर्चा सुरू असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील झुरळे गोपीनाथ मंदिर हे भाविकांचे केंद्र बनले आहे. जुन्या परळीतील गणेशपार भागात सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे ‘ हरी आणि हर यांच्या हरिहर स्वरूपाचे दर्शन घडवणारे हे मंदिर परळीच्या धार्मिक परंपरेतील महत्त्वाचे स्थान मानले जाते.
वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर झुरळे गोपीनाथांचे दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असून, या दर्शनाशिवाय परळीची तीर्थयात्रा पूर्ण होत नाही, अशी परळी पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा आहे.
दहा फूट खोल गाभाऱ्यात विराजमान विष्णूरूप...
झुरळे गोपीनाथ मंदिर हे मंदिर शहरातील गणेशपार येथील बडवे गल्लीमध्ये आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना दहा पायऱ्या उतरून जवळपास दहा फूट खोल गाभाऱ्यात जावे लागते. या गाभाऱ्यात शालिग्राम पाषाणातील भगवान विष्णूंची चतुर्भुज मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी आयुधे असून छातीवर ऋषींच्या लाथेची खूण असल्याचे सांगितले जाते. मूर्तीच्या पायाशी जय-विजय भालदार स्वरूपात विराजमान आहेत. मंदिराची सेवा बडवे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या करत आले असून बडवे कुटुंब हे सध्या मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास असल्याची आख्यायिका....
या मंदिराच्या नावामागेही एक विलक्षण आख्यायिका सांगितली जाते. बडवे कुटुंबातील एका व्यक्तीच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि घरातील विहिरीत आपली मूर्ती असल्याचे सांगितले. त्यानंतर खोदकाम केले असता ही मूर्ती सापडल्याची माहिती दिली जाते.कलियुगात आपल्यासोबत राहण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोपिकांना झुरळांच्या रूपात राहण्याचा वर दिला आणि त्यामुळेच या देवस्थानाला ‘झुरळे गोपीनाथ’ हे नाव पडल्याची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात वर्षभर लहान-मोठ्या झुरळांचा वावर दिसून येतो. ही झुरळे भाविकांना सहसा स्पर्श करत नाहीत; मात्र ज्यांच्या अंगावर ती पडतात, त्यांना भाग्यवान समजले जाते.
हरिहर क्षेत्र म्हणून धार्मिक महत्त्व....
प्रभू वैद्यनाथ म्हणजे ‘हर’ आणि गोपीनाथ म्हणजे ‘हरी’ या दोन्ही देवतांचे महत्त्व परळी क्षेत्रात विशेष मानले जाते. त्यामुळे वैद्यनाथ दर्शनानंतर गोपीनाथ दर्शन घेण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. झुरळे गोपीनाथांचे दर्शन घेतल्याने आयुष्य वृद्धिंगत होते, आरोग्य सुधारते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात भाविकांची मोठी श्रद्धा असून वर्षभर दर्शनासाठी गर्दी असते. गोकुळाष्टमी आणि अधिक मासात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. अधिक मासात विष्णुपुरी दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने परळी व परिसरातील हजारो भाविक या काळात झुरळे गोपीनाथांचे दर्शन घेतात.
मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज...
परळीतील अनेक प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला असला तरी झुरळे गोपीनाथ मंदिर अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. मंदिराच्या सभामंडपात पावसाळ्यात पाणी गळते तसेच भिंतींना ओलसरपणा येत असल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मंदिराच्या जतनासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
श्रद्धा, इतिहास आणि रहस्य जपणारे अनोखे देवस्थान...
परळीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनलेले झुरळे गोपीनाथ मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि रहस्य यांचे अनोखे मिश्रण मानले जाते. झुरळांच्या रूपात गोपिकांचे वास्तव्य असल्याची आख्यायिका आणि भूमिगत गाभाऱ्यातील प्राचीन विष्णूमूर्ती यामुळे हे मंदिर भाविकांना आकर्षित करते