

डोंबिवली : स्विगी आणि झोमॅटोकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे रायडर्सना आर्थिक हालाकीला सामोरे जावे लागत असे. शिवाय अनेक गंभीर समस्यांनी ग्रासलेल्या या रायडर्सना मनसेमुळे आशेचा किरण मिळाला आहे. एकाच छताखाली येऊन पुकारलेल्या बंदमुळे स्विगी आणि झोमॅटो प्रशासनाने नांगी टाकली.
सोमवारी दुपारी कल्याण-शिळ महामार्गावरील पलावा/लोढा भागातील तब्बल ४०० स्विगी/झोमॅटोच्या रायडर्सनी बेमुदत बंदची हाक दिली. या बंदला मनसेने पाठिंबा दिल्यानंतर स्विगी/झोमॅटो प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून रायडर्सना दिलासा दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून स्विगी आणि झोमॅटोच्या डिलेव्हरी करणाऱ्या रायडर्सना विविध विषयांवर मॅनेजमेंटकडून मन:स्ताप सहन करावा लागत होता. हे रायडर्स त्यांच्या स्तरावर बोलणे करत असताना त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांना दिलेल्या निवेदनातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आमच्या बंदला आपण पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती.
राजू पाटील यांनी हा विषय मार्गी लावण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. या आदेशाचे पालन करताना मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संबंधित परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी होऊ देणार नाही, असा इशारा स्विगी झोमॅटोच्या व्यवस्थापकांना दिला. त्यानंतर स्विगी आणि झोमॅटोच्या व्यवस्थापकांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी व्यवस्थापकांनी रायडर्सच्या काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्यांसाठी कालावधी मागितला आहे.
चर्चा सकारात्मक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रायडर्स बंद तात्पुरता स्थगित करून संपूर्ण मागण्या मान्य होण्यासाठी १० दिवसाचा कालावधी दिला. पुढील दहा दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या माध्यमातून देण्यात आला. या प्रसंगी मनसेचे विधानसभा सचिव अरूण जांभळे, शहर संघटक तकदिर काळण, विभागायक्ष रोहीत भोईर, उपविभागाध्यक्ष राजेश काशीकर, पुष्पा भोरे, संतोष पांडे, विनोद चौधरी, प्रविण बोऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी आणि राजसैनिक, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलन यशस्वी होण्याकरिता पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले.