

डोंबिवली : डोंबिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आरोपीने मुलीचा अर्धनग्न व्हिडिओ मिळवून तो तिच्या वडिलांना पाठवला आणि पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून ब्लॅकमेलर चिराग गवांडे (२२) नामक तरूणाचा शोध सुरू केला आहे.
या संदर्भात पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी अकराव्या इयत्तेत शिकते. तिचे वडील कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत राहतात. मुलीशी सहज संपर्क साधता यावा म्हणून त्यांनी तिला एक चांगला मोबाईल घेऊन दिला होता. याच मोबाईलवर मुलीने चॅटिंग ॲप डाऊनलोड केले. तिच्या आईने ते ॲप डिलीट करायला सांगितले. मात्र तरी देखील तिने ते डिलीट केले नाही. याच दरम्यान इंस्टाग्रामवर तिची चिराग गवांडे नावाच्या तरुणाशी मैत्री झाली.
मैत्री झाल्यानंतर चिरागने मुलीकडून तिचा इंस्टाग्राम आयडी आणि पासवर्ड घेतला. काही दिवसांनी त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. माझ्याकडे तुझे काही फोटो आणि पासवर्डही आहे. जर तू मला अर्धनग्न व्हिडिओ पाठवला नाहीस, तर मी तुझे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करून तुझी बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या मुलीने त्याला व्हिडिओ पाठवले. चिरागने मुलीकडून मिळवलेले आक्षेपार्ह व्हिडिओ तिच्या वडिलांना इंस्टाग्रामवर पाठवले.
त्यानंतर त्याने त्यांना फोन करून तुमच्या मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ माझ्याकडे आहेत. आता आपण बिझनेसबाबत बोलूया, असे म्हणत पैशांची मागणी केली. या प्रकाराने भयभीत झालेल्या कुटुंबीयांनी तात्काळ मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी मुलीला आणि तिच्या पालकांना धीर दिला. तसेच या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ब्लॅकमेलर चिराग गवांडे याच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत. या प्रकारामुळे मुलीचे कुटुंब भयभीत झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे.