

MLA Shivaji Patil Honeytrap Case Accused Update
ठाणे : चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील यांना व्हाट्सअपवर अश्लील फोटो पाठवून त्यांच्याकडून 5 ते 10 लाखाची मागणी करणारा तरुण मोहन ज्योतिबा पवार (26) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने नेहा, पूजा असे विविध नावाने आमदारांसोबत चॅटिंग करीत आपण तरुणी असल्याचे तो भासवत होता. दरम्यान हा गुन्हा हनीट्रॅपचा नसून खंडणी प्रकरण असल्याचे वागळे इस्टेट परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सोमवारी सांगितले. अटक आरोपी मोहन पवार याला ठाणे न्यायालयाने 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अटक आरोपी मोहन ज्योतिबा पवार (26, रा.मांडीदुर्ग, हनुमान गल्ली, ता. चंदगड, जिल्हा कोल्हापुर) येथील शेतकरी आहे. त्याने चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना व्हाट्सअपवर आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ पाठवून 5 ते 10 लाखाची खंडणी मागितली होती. पूजा, नेहा अशा विविध नावाने वेगवेगळ्या नंबर वरून अश्लील फोटो पाठवण्यात येत होते.
अज्ञात महिलेच्या नावाने सुरू असलेला हा जाच वाढल्याने आ. पाटील यांनी चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करीत सर्व चॅटिंग आणि व्हिडीओचे पुरावे पोलिसांना दिले. चितळसर पोलिसांनी तांत्रिक अभ्यास करून आरोपी मोहन पवार हा कोल्हापूरचा असल्याचे निष्पन्न केले होते. ठाणे पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांना संपर्क करून पवार याला 12 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत सर्व बिंग बाहेर पडले. त्याने या प्रकरणात एका तरुणीचा आयडी वापरला आहे. त्या तरुणीची देखील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तरुणीच्या नावाने चॅटिंग
अटक करण्यात आलेला तरुण इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियावरून फोटो मिळवून त्याआधारे आपण तरुणी आहोत असे भासवून अनेकांना व्हाट्सएपवरून संपर्क साधत होता. नेहा, पुजा अशी विविध नावे तो वापरत होता. तर त्याने आपण खरच तरुणी आहोत हे पटवून देण्यासाठी आणि सिम कार्ड मिळवण्यासाठी एका तरुणीचे आयडी वापरल्याचे देखील समोर आले आहे. आ. शिवाजी पाटील यांची आणि आरोपीची भेट मागील दिवाळीच्या सुमारास झालेली होती.
आरोपी त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने नोकरी लावण्यासाठी विनंती केली होती. तर त्याने सहा महिने लोणावळा येथे वेटर म्हणून देखील काम केले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी चितळसर पोलीस ठाण्याचे एक सहायक पोलिस निरीक्षक आणि दोन पोलिस शिपाई असे तीन जणांचे पथक 11 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे रवाना झाले होते. त्यानंतर कोल्हापूर व ठाणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत या घटनेतील आरोपीस अटक केली.