

Chandgad MLA Shivaji Patil Honey Trap Case
ठाणे : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार्या महिलेस ठाणे व कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली. याच प्रकरणात महिलेच्या भावाचा देखील सहभाग आढळला असून त्यालाही पोलिसांनी अटक केली. शामल जोतिबा पवार (26) आणि मोहन जोतिबा पवार (26) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दोघेही बहीण-भाऊ आमदारांच्या मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावातील राहणारे आहेत.
आमदार शिवाजी पाटील यांचे ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात घर आहे. त्यांच्या घरी असताना त्यांना एका महिलेने विधानसभा निवडणुकीपूर्वी व्हॉटस्अपवर संपर्क साधत त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने व्हॉटस्अपवरून वारंवार संपर्क साधत त्यांना अश्लील फोटो पाठवले होते.
बरेच दिवस ही महिला संपर्कात राहिल्यानंतर तिने आमदारांना ब्लॅकमेलिंग करीत दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या महिलेचा त्रास वाढल्यानंतर आमदार पाटील यांनी ठाणे पोलिसात महिनाभरापूर्वी तक्रार दाखल केली होती. ठाणे पोलिसांनी चौकशीअंती याप्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे व कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या ब्लॅकमेल करणार्या महिलेस अखेर कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. शामल जोतिबा पवार असे तिचे नाव असून तिचा भाऊ मोहन जोतिबा पवार यास देखील अटक करण्यात आली.
मैत्रीचा बहाणा
प्राथमिक चौकशीत समोर आले की, आरोपी मोहन पवार आणि त्याची बहीण शामल यांनी मैत्रीच्या नावाखाली आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधून नंतर अश्लील मेसेज व फोटो पाठवत त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता.