

सुनील कदम
कोल्हापूर : एक हनी ट्रॅप प्रकरण सध्या जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे; पण कोल्हापूर शहरात अनेक ‘हनी ट्रॅन स्पॉट’ असून, मालदार आणि वयोवृद्ध आंबटशौकीन या सापळ्यात अडकून कंगाल होताना दिसत आहेत; पण सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी लुटले गेलेले असे लोक कुठेही तक्रार न करता चिडीचूप बसताना दिवसताहेत.
कोल्हापुरात अनेक वर्दळीची ठिकाणे आहेत, तसेच काही बागबगिचेही आहेत. जिल्हाभरातून आणि बाहेरूनही रोज वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने हजारो लोक शहरात येत असतात. कामाच्या दरम्यान थोडीफार विश्रांती म्हणून काही लोक नजीकच्या बागबगिच्यात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये वेळ घालविण्याचा प्रयत्न करतात. अशा ठिकाणी अगदी हमखास चार-दोन ‘ललना’ उपस्थित असलेल्या दिसतात. पेहरावावरून आणि अंगावरील दागदागिन्यांवरून त्यांच्या ‘सराईत नजरा’ आपला बळीचा बकरा निश्चित करतात. सहसा पन्नाशीच्या वरच्या वयोगटातील ‘सावज’ हेरले जाते. त्यानंतर सुरू होते डोळ्यांची अदाकारी आणि खुणवाखुणवी, अशा अदाकारीला आंबटशौकीन निश्चितच भुलतात आणि सापळ्यात अलगद अडकतात.
असे सावज टप्प्यात आले की, पुढचा टप्पा म्हणजे नजीकच्या एखाद्या ठिकाणी चहा-कॉफी घ्यायला जाणे. चहा घेता घेताच आपल्या लाडीक अदांनी या बया बोलता बोलता समोरच्याची सगळी ‘आर्थिक ऐपत’ जोखतात. घायाळ झालेला तो तिच्यावर इंप्रेशन मारण्याच्या नादात आपली ‘औकात’ जरा फुलवूनच सांगत असतो. साहजिकच, या बोलाचालीनंतर पुढे प्रत्यक्ष भेटीचा दिवस निश्चित केला जातो.
घायाळ झालेला तो ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या लॉजवर, भरल्या खिशाने दाखल होतो. थोड्याच वेळात त्याची ती ‘रंभा, मेनका किंवा उर्वशी’ दाखल होते. दोघांच्या जरा कुठे गोडीगुलाबीच्या गप्पा सुरू होतात, तेवढ्यात दारावर थाप पडते, तीच लगबगीने उठून दार उघडते आणि चार-पाच धटिंगण आत घुसतात. कोण त्या बयेचा भाऊ बनून, कोण नवरा, कोण चुलता-मालता आणि कुणी काय बनून आलेला असतो. सुरुवातीला या प्रकाराबद्दल तिला मारहाण केल्याचे नाटक केले जाते आणि शेवटी या ‘आशिका’ची धुलाई चालू होते. आमच्या बायकांना नादाला लावतो काय, म्हणून बेदम चोप देऊन पोलिस कारवाईची भीती घालून त्याच्या खिशातील पैसे, दागदागिने काढून घेऊन त्याला हाकलून दिले जाते. बिचार्याची अवस्था ‘खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा बारा आणा..!’ अशी होऊन जाते; पण इज्जतीच्या भीतीपोटी कुणी तक्रार करण्यास धजावत नाही.
शहरात काही लॉज अशाप्रकारच्या हनी ट्रॅपसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच, हनी ट्रॅप लावणार्या अनेक टोळ्याही वेगवेगळ्या भागात वावरताना दिसतात. आजपर्यंत या सापळ्यात अडकून अनेकजण लुबाडले गेले आहेत.
मध्यवर्ती बसस्थानक परिसर, रेल्वे स्थानक परिसर, टाऊन हॉल गार्डन, महावीर गार्डन, रंकाळा तलाव परिसर, तावडे हॉटेल चौक, सांगली फाटा, महामार्गावरील काही ठराविक हॉटेल्स आणि धाबे, विद्यापीठ परिसरातील काही ठराविक हॉटेल्स यासह शहरातील वर्दळीच्या काही ठिकाणी हनी ट्रॅपशी संबंधित महिला आणि त्यांच्या टोळ्या हमखास उंडारताना दिसून येतात. त्यामुळे चवचालपणाच्या नादात आर्थिक दगाफटका आणि वरून पुन्हा बेदम मारहाण होण्यापूर्वीच सावध राहण्याची गरज आहे. अशा हनी ट्रॅपमध्ये अडकून फटफजिती झालेल्यांचे अनेक किस्से आजकाल ऐकायला मिळतात.