मिरा रोड : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मिरा रोड येथील एका ५४ वर्षीय नागरिकाची तब्बल ७२ लाख ५० हजार ३२१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात सायबर भामट्यांनी विविध माध्यमातून संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा परतावा मिळेल, असा विश्वास निर्माण केला. त्यांच्या भूलथापांवर विश्वास ठेवून संबंधित नागरिकाने वेळेोवेळी लाखो रुपये गुंतवले. मात्र, मोठी रक्कम गुंतवल्यानंतर कथित एजंटकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा रोडच्या कनाकिया रोड परिसरातील बी.एम.सी. कमिशनर बंगल्यामागे असलेल्या भैरव रेसिडेन्स्रीमध्ये राहणारे रोनाल्ड जॉन (वय ५४) हे सामाजिक सल्लागार आहेत. १५ जुलै २०२६ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. अज्ञात आरोपींनी जॉन यांच्याशी संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला गुंतवणुकीबाबत विश्वास निर्माण केल्यानंतर त्यांना विविध प्रकारे पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. नफ्याच्या आशेने जॉन यांनी आरोपींच्या सांगण्यावरून वेळोवेळी एकूण ७२ लाख ५० हजार ३२१ रुपये गुंतवले.
आपल्याकडून मोठी रक्कम घेतल्यानंतर आता दिशाभूल केली जात असल्याचे लक्षात येतांच जॉन यांनी या संपूर्ण व्यवहाराची माहिती घेतली. त्यानंतर शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली आपली जाणीवपूर्वक आर्थिक फसवणूक करण्यात आल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले. अखेर त्यांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
सायबर भामट्यांचा शोध सुरू
जॉन यांच्या तक्रारीनंतर मिरा रोड पोलिसांनी मंगळवारी दुपारी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा केला आहे. या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, जॉन यांच्याकडून ज्या पद्धतीने रक्कम स्वीकारण्यात आली, त्या व्यवहारांचा मागोवा घेतला जात आहे. आरोपींनी आणखी किती जणांना अशाच प्रकारे लक्ष्य केले आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जिलानी सय्यद करीत आहेत.