

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर आणि जिल्हा रुग्णालयातील त्यांच्या सहकारी डॉ. स्वाती चव्हाण या दोघांवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने शासकीय सेवेतून निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
दोघांवरही या प्रकरणाच्या तपासादरम्यान संशय व्यक्त करण्यात आला होता. अटकेनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने संबंधित शासकीय नियमांनुसार ही कारवाई केली आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीपासूनच त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्याभोवती संशयाची सुई फिरत होती.
प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना पोलिसांनी त्यांची चौकशी केली. अटक टाळण्यासाठी डॉ. निलेश जेजुरकर यांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला. त्यांनी सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. मात्र, तिन्ही स्तरांवर त्यांना दिलासा मिळाला नाही. अखेर त्यांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील डॉ. स्वाती चव्हाण यांचीही नाशिक क्राइम ब्रँच युनिट एककडून वारंवार चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्यांची तब्बल नऊ वेळा चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना या मृत्यू प्रकरणात सहआरोपी करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली.
डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरोधात यापूर्वीच चौकशी सुरू असताना त्यांची पालघर येथे बदली करण्यात आली होती. मात्र, अटकेनंतर त्यांच्या शासकीय सेवेत असण्याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेत दोघांनाही निलंबित केले आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, तपासातून आणखी कोणते तथ्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.