

मिरा रोड: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने व नयानगर पोलिसांनी शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण 23 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.
मिरारोड येथील वेस्टर्न हॉटेल जवळ टियारा हिल्स सोसायटीजवळ 24 एप्रिल रोजी मध्यरात्री 12:45 च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. अर्शद अली हुसेन अली नकवी, (38) रा. खार, मुंबई याच्याकडून 11,80,000 रुपयाचे 59 ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले.
तर त्याचा साथीदार हुसेन अली फिरोज अली बदामी ,(31) रा. शांतीनगर, मिरारोड याच्याकडे 8,38,000 रुपयांचे 41.9 ग्रॅम मॅफेड्रॉन सापडले. या कारवाईत गुन्ह्यासाठी वापरलेली एक मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे.
काशिगाव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या विविध कलमा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक समीर शेख हे करत आहेत.
दुसऱ्या कारवाईत नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वडापाव विक्रेत्याला अंमली पदार्थांची विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. 24 एप्रिल रोजी मध्यरात्री लोधा रोड येथील सीता पार्क इमारतीत ही कारवाई करण्यात आली.
फारुख युसुफ खान (50) रा. नयानगर, मिरारोड याच्या आरोपीच्या अंगझडतीत व घराची झडती घेतली असता 12.480 ग्रॅम गरद (हेरॉईन) नावाचा अंमली पदार्थ सापडला. नयानगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शैलेंद्र पाटील हे करत आहेत.