Mira Bhayandar news: मिरा-भाईंदर महासभेत गोंधळ; नगरसेवकांवरील तक्रारीनंतर पालिकेचे पोलिसांना पत्र

प्रेक्षक गॅलरीत जबरदस्तीने प्रवेश करून नागरिकांना मारहाण आणि MSF जवानांना धक्काबुक्की केल्याचा आरोप; भाईंदर पोलिसांकडून तपास सुरू
Mira Bhayandar news
Mira Bhayandar newsPudhari
Published on: 
Updated on: 

भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेदरम्यान प्रेक्षक गॅलरीमध्ये जोर जबरदस्ती प्रवेश करून भाजप नगरसेवकांकडून स्थानिक नागरीकांना झालेल्या हाणामारीसह महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी पालिकेला प्राप्त झालेल्या तक्रारी व निवेदनांच्या अनुषंगाने पालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सचिन. बांगर यांनी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निर्देशानुसार भाईंदर पोलीस ठाण्याला उचित कारवाईसाठी १९ ऑक्टोबर रोजी पत्र दिले आहे.

याप्रकरणी तपास करून योग्य ती कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Mira Bhayandar news
Sanjay Gandhi National Park Firing Case: साथीदाराचा मृत्यू लपविला; बिंग फुटले! डॉक्टरसह सात जणांवर गुन्हा, दोघांना अटक

पालिकेत १६ ऑक्टोबर रोजी आयोजित महासभेदरम्यान प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या काही आरटीआय कार्यकर्त्यांकडून सभेचे चित्रीकरण करण्यात येत असल्याच्या संशयावरून भाजपच्या काही नगरसेवक व नगरसेविकांनी प्रेक्षक गॅलरीतजोर जबरदस्तीने प्रवेश करून त्या व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला.

यावेळी स्थानिक पोलीस व एमएसएफ जवानांनी त्या नगरसेवकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील त्या नगरसेवकांनी धक्काबुक्की केली.

तसेच सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या एका उपनिरीक्षकावर एका नगरसेविकेने हात उचलल्याचा प्रकार व्हायरल व्हीडिओमध्ये दिसून आला. या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही काही नगरसेवकांनी मारहाण व धक्काबुक्की करीत त्यांचे मोबाईल खेचून जमिनीवर आपटले.

सभेचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. आणि याच राड्यात पोलिसांनी एका स्थानिक पत्रकाराला देखील ताब्यात घेतले. याप्रकरणी आरटीआय कारकर्त्यांसह भाजप नगरसेवकांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले.

Mira Bhayandar news
Jitendra Awhad Threat Case: आव्हाडांना धमकी देणाऱ्याला पुण्यात अटक; टीव्हीवर बातमी पाहताच घरमालकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले

यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पालिका आयुक्तांच्या निवासस्थानी धडक दिली. प्रशासनाने शनिवारी पहाटेपर्यंत सभेचे इतिवृत्तांत तयार करून पालिकेमार्फत त्या आरटीआय कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सर्व स्तरांवर तीव्र संताप पसरला असून पालिका व पोलीस सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करण्यात येऊ लागला. याविरोधात मराठी एकीकरण समिती, मनसे, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे व शिंदे गट), आम आदमी पार्टी, विविध सामाजिक संघटनांनी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या आंदोलन छेडला.

लोकांचा वाढता रोष

लोकांचा वाढता रोष लक्षात घेत पालिका आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांसह सर्व पक्षांचे प्रतिनिधी व नागरीकांची तातडीची बैठक बोलविली. त्यात भाजप नगरसेवकांनी जमाव जमवून जोर जबरदस्तीने प्रेक्षक गॅलरीत प्रवेश करुन तेथील एमएसएफ जवानांना धक्काबुक्की करीत त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची बाब पालिका व पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

त्याची दखल घेत पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर यांना घटनेचा योग्य तपास करून उचित कारवाई करण्याबाबतचे पत्र भाईंदर पोलिसांना देण्याचे निर्देश दिले. तसे पत्र पालिकेने पोलिसांना दिले असून त्याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर पोलिसांच्या निष्पक्ष तपासाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news