Sanjay Gandhi National Park Firing Case: साथीदाराचा मृत्यू लपविला; बिंग फुटले! डॉक्टरसह सात जणांवर गुन्हा, दोघांना अटक

मोबाईलचा प्रकाश वन्यप्राण्याचे डोळे समजून गोळीबार झाल्याचा आरोप; मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी डॉक्टरसह सात जणांविरुद्ध गुन्हा
Gun Firing
Gun FiringPudhari
Published on: 
Updated on: 

मिरा रोड: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार करण्यासाठी गेलेल्या टोळीतील एकाचा बंदुकीच्या गोळीने मृत्यू झाला. मोबाईलच्या प्रकाशाला वन्यप्राण्याचे डोळे समजून झाडलेले छरे थेट विजय सापटे (६०) यांच्या छातीत आणि पायात घुसले.

या घटनेनंतर पोलिसांना कळविण्याऐवजी मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी डॉक्टरसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी महेश गायकर आणि काठोड लाबड या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चेनागाव परिसरातील डेबुचा घाट येथे सात जणांची टोळी शिकारीसाठी गेली होती. त्यांच्याकडे छऱ्यांची बंदूक आणि दोन ठासणीच्या बंदुका होत्या.

Gun Firing
Jitendra Awhad Threat Case: आव्हाडांना धमकी देणाऱ्याला पुण्यात अटक; टीव्हीवर बातमी पाहताच घरमालकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले

रात्री साडेनऊच्या सुमारास जंगलात मोबाईलचा प्रकाश दिसला. हा प्रकाश वन्यप्राण्याचे डोळे असल्याचा गैरसमज झाल्याने महेश गायकर याने दुहेरी नळीच्या बंदुकीतून गोळीबार केला. मात्र, बंदुकीतील छरे विजय सापटे यांच्या छातीत आणि पायात घुसले.

या घटनेत कल्पेश डगला आणि कुणाल शेलार हे दोघेही जखमी झाले. गंभीर जखमी सापटे यांना जंगलाबाहेर आणत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, तसेच मृताच्या मुलालाही प्रकरणात अडकविण्यात येईल, अशी धमकी आरोपी महेश गायकर याने मृताच्या कुटुंबीयांना दिल्याचा आरोप आहे.

मात्र, गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर काशीगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली.या प्रकरणी महेश अनंत गायकर (५२), रोहित सापटे, कल्पेश डगला, कुणाल शेलार, काठोड लाबड (५५), प्रवीण जाधव आणि डॉ. राजेश पालांडे या सात जणांविरुद्ध निष्काळजीपणा, पुरावे नष्ट करणे आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील महेश गायकर आणि काठोड लाबड यांना अटक करण्यात आली आहे.

इतर आरोपींच्या भूमिकेबाबत तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे व आशुतोष चव्हाण यांच्या पथकाने केली.

Gun Firing
Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी साठवून ठेवा! मुंब्रा-दिव्यासह अनेक भागांत ३६ तास पाणीबाणी

मृत्यू लपविण्यासाठी घाईघाईत अंत्यसंस्कार?

विजय सापटे यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता जखमींना काशीगाव येथील आशिष रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉ. राजेश पालांडे यांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे मृतदेह दाखवून मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप आहे.

त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास चेनागाव स्मशानभूमीत मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळू नये आणि गुन्ह्याचे पुरावे नष्ट व्हावेत, या उद्देशाने हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जंगलात रक्ताचे डाग, छरे आणि बंदुकीचे भाग जप्त

फॉरेन्सिक पथकाने डेबुचा घाट परिसराची पाहणी करून रक्ताचे डाग असलेली झाडांची पाने, दगड, बंदुकीतील छरे, चप्पल आणि रायफलचा भाग जप्त केला.

काही अंतरावरून सिंगल बोअर बंदूकही हस्तगत करण्यात आली. याशिवाय मृताच्या घरातून रक्त पुसण्यासाठी वापरलेले कापड आणि कपडे जप्त करण्यात आले आहेत.

या वस्तूंच्या तपासातून गोळीबार आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या कथित प्रयत्नांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news