

भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेची महासभा सुरू असताना त्याचे चित्रीकरण करण्याच्या संशयावरून भाजप नगरसेवकांनी प्रेक्षक गॅलरीतील काही जणांवर हल्ला केला.
या राड्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना देखील त्या नगरसेवकांनी मारहाण करून त्यांचे मोबाईल खेचून खाली आपटले. अशी गुंडगिरी करणाऱ्या भाजप नगरसेवकांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे.
शुक्रवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रेक्षक गॅलरीत काही प्रेक्षक महासभेचे चित्रीकरण करीत असल्याचा संशय महापौर डिंपल मेहता यांना आला. याबाबत महापौरांनी चित्रीकरण न करण्याचे निर्देश त्यांना दिले. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी चित्रीकरण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुरक्षारक्षक व पोलिसांना दिले. महासभेचे थेट प्रक्षेपण व चित्रीकरण करण्यास महापौरांनी मनाई केली आहे.
यामुळे काही आरटीआय कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारात माहिती घेत महापौरांच्या मनाई आदेशाविरोधात त्यांनी शुक्रवारच्या महासभेचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.
त्याचा राग आल्यानेच महापौरांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुरक्षारक्षक व पोलिसांना दिले असतानाही भाजपच्या नगरसेविका शानु गोहिल, रुपाली शिंदे-मोदी, ऍड. श्रद्धा कदम, वर्षा भानुशाली, दिपीका अरोरा, नगरसेवक नवीन सिंग, ऍड. तरुण शर्मा, संजय थरथरे, विशाल पाटील, भाजप कार्यकर्ता प्रियेश शहा व इतर नगरसेवक, नगरसेविकांनी सभागृह सोडून थेट प्रेक्षक गॅलरीत प्रवेश केला.
त्यांनी महासभेचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून संबंधित प्रेक्षकांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केला. तसेच नगरसेविका रुपाली शिंदे-मोदी यांनी थेट संबंधितांच्या दिशेने चपला फेकल्याने प्रकरण आणखी तापले. हे प्रकरण तापविणाऱ्यांमध्ये नगरसेवक ऍड. तरुण शर्मा यांचा हिरीरीने सहभाग असल्याचे दिसून आले.
शेवटी पोलिसांनी देखील नेहमीप्रमाणे भाजपची बाजू उचलून धरीत इमानदारीने चित्रीकरण करणाऱ्यांसह एका स्थानिक पत्रकाराला अक्षरशः फरफटत भाईंदर पोलीस ठाण्यात नेले. याचवेळी नगरसेविका शानू गोहील यांनी एका दैनिकाच्या पत्रकाराचा मोबाईल खेचून खाली आपटला. त्यांच्यासह इतर नगरसेवकांनी पत्रकारांना मारहाण केली. या राड्यात भाजप नगरसेविका रुपाली शिंदे-मोदी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला देखील मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला.
पत्रकार, काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांचा ठिय्या
पत्रकारांनी या नगरसेवकांविरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवरच ठिय्या मांडला. पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांसोबत ठिय्या मांडल्याने भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी गटनेते हसमुख गेहलोत, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांना पत्रकारांची भेट घेत संवाद साधण्याचे निर्देश दिले.
त्यांनी पत्रकारांची भेट घेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पत्रकारावर कोणतीही कारवाई न करण्याचे आश्वासन देत त्याला पोलिसांच्या ताब्यातून बाहेर काढले. मात्र पत्रकारांनी, मारहाण करणाऱ्या नगरसेवकांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
पत्रकारांवर हल्ला करणे हि लोकशाहीची हत्या असून भाजपला बहुमत मिळाले म्हणून कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये. पोलिसांनी देखील घटनेतील सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक