

खानिवडे : यंदा अर्ध्या वर्षापर्यंत पाऊस बरसल्याने सर्व प्रकारच्या शेती उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. उत्पादन घटल्याने भाजीपाल्याची मंडईत आवक घटली आहे. यामुळे त्यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे.परिणामी भाज्यांचे भाव वधारल्याने सर्व सामान्य गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट मात्र कोलमडले आहे.
यंदा मे ते ऑक्टोंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत पाऊस बरसला. यामुळे पिके पाण्याखाली आल्याने कुजली. तर याही स्थितीत तग धरून राहिलेली पिके त्यांच्या निर्धारित कालावधीत पिके तयार झाली तरी ती रोगट किंवा कमी उत्पादनाची झाली. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाल्याने उत्पादन घटले. आणि भाजीपल्यांच्या किंमती वधारल्या. मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या भावात दुप्पट वाढ झाली आहे.
परिणामी सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे अतोनात नुकसान केले असून, त्याचा फटका पालघर जिल्ह्यातील बाजारपेठांनाही बसला आहे. भाजीपाला उत्पादन घटल्याने मंडईत भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला असून,विक्रेत्यांनी भाववाढ केली आहे.
सध्या प्रत्येक भाजीपाल्याच्या किमती जवळपास दुप्पट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा फटका म्हणून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला भुर्दंड म्हणून सहन करावा लागत आहे. जवळपास सर्व भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. 50 रुपयांनी किलो मिळणारी कोथिंबीर आता 150 रुपयांवर पोहोचली आहे.20 चे टोमॅटो 40 वर आले आहेत.40ची भेंडी, गाजर 80 वर तर 50 च्या वांग्यांनी 100 गाठली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या आधीच कमी उत्पन्नावर आपले जीवन व्यतीत करीत असल्याने ही भाववाढ त्यांच्यासाठी मोठे संकट बनली आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा फटका शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही बसला आहे. गोरगरीब जनतेसाठी महागाई ही आता नव्या संकटाचे रूप धारण करीत आहे.आता रब्बी लागवडीची भाजी तयार होईपर्यंत हे भाव आटोक्यात येतील असे वाटत नसल्याचे जाणकार सांगत आहेत.