

मोखाडा ः तालुक्यातील वारघडपाडा परिसरात सोमवारी सायंकाळी बिबट्या चा संचार झाल्याचे कळताच कळल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच मोखाडा वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव होऊन बिबट्याच्या हालचालीं वरती लक्ष ठेवण्याचे काम केले. परंतु वारघडपाडा परिसरात दिसलेला बिबट्या दररोज परिसर बदलून फिरत असून सोमवारी सायंकाळी भारत पेट्रोल पंप परिसरात रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या मोटारसायकल चालकावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
मागील आठ, नऊ दिवसांपासून मोखाड्यातील वारघडपाडा,तळ्याचापाडा,ग्रामीण रुग्णालय परिसरात सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार सर्वत्र सुरू असल्याचे अनेक नागरिकांनी बघितले आहे. त्यामुळे मोखाडा परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. सोमवारी रात्रीच्या वेळेस नाशिक डहाणू महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मोटारसायकल चालकांवर भारत पेट्रोल पंप परिसरात हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
मात्र आठ,नऊ दिवसांपासून मोखाडा परिसरात जागा बदलून फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न मोखाडा वन विभागातील कर्मचारी का करत नाहीत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तर सद्यस्थितीत शेतकरी पिकाची कापणी लवकर व्हावी म्हणून पिकाच्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम करत आहेत.
अशा शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीच्या ठिकाणी मुक्काम राहणाऱ्या लोकांनी रात्रीच्या वेळी खबरदारी घ्यावी. आपली गुरे,शेळी,कोंबड्या याची काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा समाज माध्यमातून करण्यात येत आहे.तर मोखाडा वन विभागाने मुक्त संचार करत फिरत असलेल्या बिबट्याचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
गावांमध्ये जाऊन नागरिकांत जनजागृती करण्याचे काम आमचे कर्मचारी करत आहेत.नागरिकांना फटाके वाटप सुध्दा करण्यात आले आहे.बिबट्या आल्याचे कळताच फटाके वाजवल्यानंतर बिबट्या पळून जातो.तरी सुद्धा नागरिकांनी काळजी घ्यावी आणि बिबट्या आल्याचे समजले तर लगेच वन विभागाला माहिती द्या.
विनोद दळवी, वनक्षेत्रपाल मोखाडा वन विभाग