

भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिकेतील महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याचे बुधवारी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असून पक्षाचे स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता हे आपल्या मर्जीतील समर्थकाला, घराण्यातील व्यक्तीला की नवीन तरुण चेहऱ्याला संधी देणार, हे सध्या गुलदस्त्यात आहे.
महापालिकेतील राजकारणाचा मागील इतिहास पाहता महापौर पदासाठी नेहमीच तडजोडीचे राजकारण अथवा अर्थकारण करण्यात आले आहे. हे तडजोडीचे राजकारण तथा अर्थकारण सत्तेसाठी आघाडी, युती करतेवेळी करण्यात आल्याचे दिसून आले होते. त्याची पुनरावृत्ती भाजपच्या एकहाती सत्तेतही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असून या पक्षाचे 86 पैकी तब्बल 78 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे सत्तेचे समीकरण व सत्तेतील महत्वाची संविधानिक पदे भाजपभोवतीच वलयांकित होणार आहेत. त्याचा निर्णय पक्षाचे स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता घेणार असले तरी त्यांनी मागील पत्रकार परिषदेत महापौर पदावर कोणाला संधी द्यायची त्याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील, असा दावा केला होता. तर निवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवरील निर्णय त्याच पातळीवरील नेते घेतील, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. त्यामुळे महापौर पदाचा निर्णय स्थानिक पातळीवरच होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हा निर्णय घराणेशाहीच्या बाजूने जाऊन मेहता यांच्या वहिनी तथा माजी महापौर डिंपल मेहता यांची पुन्हा महापौर पदावर वर्णी लागण्याची अटकळ केली जात आहे.
महापौर पदावर डिंपल मेहता यांची वर्णी लागल्यास त्याचा रिमोट मेहता यांच्या हाती राहणार आहे. मात्र त्यांनी डिंपल यांना वगळून मर्जीतील समर्थकाची महापौर पदावर वर्णी लावल्यास त्यावेळी देखील मेहता हेच कर्ते-धर्ते ठरणार असले तरी मागील अनुभव पाहता पक्षाला तसेच मेहता यांना त्याचा चांगलाच फटका बसला होता. त्याचा कटू अनुभव पाहता मेहता हे समर्थकांच्या हिताची बाब बाजूला ठेवून ते नवीन तरुण चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता...
यंदाच्या निवडणुकीत मेहता यांनी तरुण तसेच उच्च शिक्षित नवीन 10 उमेदवारांना संधी दिली होती. त्यात हे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. त्यातीलच एका तरुण महिला चेहऱ्याला महापौर पदावर विराजमान होण्याची संधी मिळण्याची अटकळ केली जात असून त्यावेळी देखील तडजोडीचे राजकारण अथवा अर्थकारण होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविली जात आहे.