

मुंबई: महानगरपालिकेतून मुकादम म्हणून निवृत्त झालेल्या एका 75 वर्षांच्या वयोवृद्धाची राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या नावाने ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. दिल्लीतील बॉम्बस्फोटासह मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून या ठगाने त्यांना साडेसोळा लाखांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पश्चिम सायबर सेल पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यातील तक्रारदार मनपामध्ये निवृत्त झाले असून सध्या ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत अंधेरी परिसरात राहतात. गेल्या महिन्यांत त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो दिल्लीतील एटीएस विभागाकडून बोलत असल्याचे सांगून त्यांचा अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्याने त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
हा ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना सदानंद दाते नाव सांगणाऱ्या व्यक्तीने तो राष्ट्रीय तपास यंत्रणेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या बँक खात्यात मनी लाँडरिंगचे सात कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय दहशतवादी संघटनेच्या टार्गेटवर आहे. त्यांचा अलीकडेच दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे पुरावे असल्याचे सांगून त्यांना या गुन्ह्यांत कोणत्याही क्षणी अटक होईल असे सांगितले. त्याने त्यांना त्यांचा अरेस्ट वॉरंट पाठविले होते.
त्यानंतर त्याने त्यांना त्यांच्या बँक खात्याची चौकशी सुरू असल्याने खात्यातील सर्व रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी 11 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी 2026 या कालावधीत संबंधित बँक खात्यात साडेसोळा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर होताच त्याने त्यांना ॲपवर ब्लॉक केले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह उत्तर सायबर सेल विभागाला घडलेला प्रकार सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.