

कल्याण : सतीश तांबे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी अनुसूचित जमाती वर्गासाठी आरक्षित झाले आहे. या प्रवर्गातून निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे नवनियुक्त नगरसेवक, किरण भांगळे व हर्षाली थविल तर मनसेच्या शीतल मंढारी या तिघाची नावे महापौर पदासाठी शर्यतीत असून तिघापैकी एकाच्या गळ्यात महापौर पदाची माळ गळ्यात पडणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण पद कोणत्या वर्गासाठी जाहीर होते, यावरून गेले दोन दिवस तर्क-वितर्काचे ठोकताळे मांडून महापौर पदासाठी अनेक मातब्बर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्याच्या आशेवर पाणी फेरले आहे.
महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेने युतीत निवडणूक लढविली. भाजपाने 56 जागा लढवित 50 जागांवर विजय मिळविला तर शिवसेना शिंदे गटाने 67 जागा लढवित 53 जागांवर विजय मिळविला होता. युतीच्या दोन्ही पक्षांनी मिळून 103 जागा काबीज केल्यानंतर शिवसेना शिंदे गट व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये मिळालेल्या जागांमध्ये केवळ तीन जागा कमी जास्त मिळाल्याने दोन्ही पक्षांनी महापौर आपल्याच पक्षाचा बसाविण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली होती.
महापौर पदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी शिंदे सेनेने 53 नगरसेवकांचा, मनसेने 5 नगरसेवकांचा, उद्धव सेनेने 7 नगरसेवकांचा गट स्थापन केला. शिंदेसेनेच्या संपर्कात उद्धव सेनेचे 4 नगरसेवक आहेत. मनसेने भाजपचा वचपा काढण्यासाठी शिंदे सेनेला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे महापौर पदाचे समीकरण फिरले आहे.
भाजपने अद्याप गटच स्थापन केलेला नाही. शिवसेना शिंदे गटाने महापौर पदाची मॅजिक फिगर गाठण्याची पूर्ण तयारी आहे. तरी देखील शिवसेना शिंदे गट व भाजपाकडून महापौर महायुतीचा बसणार असेच सांगितले जात आहे. आरक्षण पाडण्यापूर्वी महापौर पदासाठी इच्छुक असलेले मातब्बर नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बाधून बसले होते, मात्र गुरुवारी महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी जाहीर झाल्याने त्यांचा आशेवर पाणी फेरले आहे.
महापौर पदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षणासाठी शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आलेले किरण भांगले आणि हर्षाली थवील यांची नावे पुढे आली आहेत. या दोघांसह शिंदे सेनेच्या सर्व सदस्यांना घेऊन शहर प्रमुख रवि पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मुंबईला रवाना झाले. त्याठिकाणी बैठक असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिंदे सेनेला मनसेने पाठिंबा दिला असल्याने मसेकडूनही शीतल मंढारी यांचेही नाव समोर आले आहे. पाठिंब्याच्या बदल्यात शिवसेना शिंदे गट मनसेला महापौर पद देतील की नाही याची शंका आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे किरण भांगळे व हर्षला थवील हे दोघे दावेदार आहेत.
किरण भांगळे हे शिंदेसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांचे निकटवर्तीय आहे. ते प्रथमच नगरसेवक पदी निवडून आलेले तरुण नगरसेवक असून ते बी.ई मेकॅनिक इंजिनियर आहेत तर हर्षाली थवील या दुसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या असून त्या वकील आहेत. दोन्ही उच्चशिक्षित उमेदवार असल्याने नेमकी कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
दोघांपैकी एकाला संधी
शिवसेना शिंदे गटाचे मास्टर माईंड डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दूरदृष्टी निर्णयावरच दोघांपैकी एकाला संधी मिळणार आहे. तर मनसेच्या शीतल मंढारी या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. पहिल्या वेळी त्या शिवसेनेतून निवडूून आल्या होत्या. त्यानंतर शिवसेना फुटीनंतर शिवसेना उबाठा पक्षात राहिल्या होत्या. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपकडून उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी ऐनवेळी मनसेत प्रवेश करून त्या निवडून आल्या आहेत.
महायुतीचा महापौर बसणार...
केडीएमसीच्या महापौर पदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. महापालिकेत भाजपकडे अनुसूचित जमातीचा एकही उमेदवार नसल्याने महायुतीचा महापौर बसणार असल्याचे दिसून येत आहे. भाजपने सध्या काही ठरविलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महापौर पदासह सर्व पदांचा विषय सोडवितील, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केली आहे.