

मिरा रोड : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळ आणि हाणामारीचे पडसाद आता पोलीस ठाण्यात उमटले आहेत. महासभेच्या प्रेक्षक गॅलरीत नागरिक व पत्रकारांना मारहाण, धक्काबुक्की आणि धमकावल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपच्या १६ नगरसेवकांसह एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, भाजपच्या एका महिला नगरसेविकेच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्ते व मनसे पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवला गेला आहे.
याशिवाय पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल झाला असून, भाईंदर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता असावी यासाठी महासभेचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने करत होते. मात्र, प्रशासनाने सभागृहातील चित्रीकरणास बंदी घातली होती. सभेदरम्यान काही नागरिकांनी मोबाईलद्वारे चित्रीकरण करून या निर्णयाचा प्रतीकात्मक निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला. याच कारणा-वरून भाजप नगरसेवक आणि उपस्थित नाग-रिकांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली.
हा वाद क्षणार्धात विकोपाला गेला आणि प्रेक्षक गॅलरीत थेट धक्काबुक्की तसेच चप्पलने मारहाण करण्यात आली. या गोंधळात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही मारहाण झाली असून त्यांचे मोबाईल फोडण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते करण तानाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी भाजपच्या १६ नगर सेवकांसह कार्यकर्ता प्रियेश शहा आणि इतर अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शानू गोहिल, तरुण शर्मा, रुपाली मोदी प्रीती जैन, वंदना भावसार, हेतल परमार, विशाल पाटील, संजय थरथरे, नवीन सिंग, कविता त्रिपाठी, दीपिका अरोरा, महेश म्हात्रे, भरत कोठारी, हेमा बेलाणी, योगिता शर्मा आणि मनिष पराशर या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा
या प्रकरणाला कलाटणी देत एका भाजप महिला नगरसेविकेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महासभेतील वादादरम्यान सामाजिक कार्यकत्यांनी गैरवर्तन करून विनयभंग केल्याचा आरोप त्यांनी केला. या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्ते करण पवार, कृष्णा गुप्ता, मनसेचे सचिन पोपळे, रॉबर्ट डिसोजा आणि सतीश गुप्ता यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओंच्या आधारे तपास सुरू
महासभेतील राड्यानंतर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांनीही पोलिसांत स्वतंत्र तक्रार दिली. बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल घडवणे, लोकसेवकाला कर्तव्यापासून रोखणे, शांतताभंग करणे आणि धमकी देणे या कलमांखाली करण पवार, कृष्णा गुप्ता, सचिन पोपळे, रॉबर्ट डिसोजा, सतीश गुप्ता, दीपक सरोदे यांच्यासह इतरांवर तिसरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नागरिक व पत्रकारांवरील हल्ला, महिला लोकप्रतिनिधीचा विनयभंग आणि प्रशासकीय कामातील अडथळा अशा तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे. भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सभागृहातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध व्हिडिओंच्या आधारे निष्पक्ष तपास करत आहे.