

भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिकेची विविध आरक्षणे, भूखंड व प्रस्तावित रस्ते मीठ विभागाच्या जागेत आहेत. या आरक्षणांचा विकास करण्यासाठी पालिकेने सुधारीत मीठ विभागाच्या धोरणानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून त्या जागांच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी अनेकदा पाठविला होता. अखेर त्यावर गुरुवारी केंद्र शासनाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन खात्याचे प्रधान आर्थिक सल्लागार प्रवीण मोहतो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत मीठ विभागाच्या तब्बल 12 जागा पालिकेकडे हस्तांतर करण्यास मीठ विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.
मिरा-भाईंदर शहराचा विकास झपाट्याने होत असताना लोकसंख्या देखील मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यांच्या सोयीसुविधांसाठी विविध आरक्षणे विकसीत करणे आवश्यक बनले असतानाच पालिकेची बहुतांशी आरक्षणे, भूखंड मीठ विभागाच्या जागेत असल्याने त्यावरील विकास मीठ विभागाच्या जागा हस्तांतरणात अडकला आहे.
या जागा पालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी प्रशासनासह विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मीठ विभागासह केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यात पालिका या जागा सरकारी मूल्यांकनानुसार निश्चित दर अदा करून आपल्या ताब्यात घेणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यावर मीठ विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या जागांमध्ये भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर पालिकेच्या शहर विकास आराखड्यात स्टेडियमचे आरक्षण क्रमांक 91 टाकण्यात आले आहे.
पूर्वी या मैदानाच्या जागेत मिठाचे उत्पादन होत होते. आता त्यावर मिठाचे उत्पादन होत नसले तरी त्या जागेवर केंद्रीय मीठ विभागाची मालकी आहे. त्याची जागा सुमारे 1 लाख 80 हजार चौरस मीटर इतकी आहे.