

अलिबाग ः रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाज कल्याण सभापती दिलिप विठ्ठल तथा छोटमशेठ भोईर आणि त्यांचे 20 साथीदार अशा एकूण 21 जणांना भा.द.वि.कलम 307 अन्वये ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी, तसेच धमकी सह तोडफोड व नासधूस केल्या प्रकरणी अन्य कलमान्वये रायगड जिल्हा मुख्य सत्र न्यायाधिश राजेंद्र सावंत यांनी दोषी ठरवून सात वर्ष सक्तमजूरी आणि प्रत्येकी 7300 रुपये अशी शिक्षा सूनावली आहे. तर अन्य चौघा आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले असल्याची माहिती या खटल्यातील विशेष सरकारी अभियोक्ता ॲड.प्रसाद पाटील यांनी दिली आहे.
हल्ल्यात सातजण झाले होते जखमी
अलिबाग तालुक्यांतील चोंढी येथील व्ही-टेक कॉम्प्यूटर क्लासमध्ये 11 सप्टेंबर 2012 रोजी समाज कल्याण सभापती दिलिप विठ्ठल तथा छोटमशेठ भोईर आणि त्यांच्या 24 साथीदारांनी घातक शस्त्रांसह घूसून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात व्ही-टेक कॉम्प्यूटर क्लासच्या संचालीका रुपाली विजय थळे, त्यांचे पती विजय थळे आणि अन्य नातेवाईक असे सातजण गंभीर जखमी झाले होते. या सशस्त्र हल्ला प्रकरणी रुपाली विजय थळे यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार तपास करुन मांडवा सागरी पोलीसांनी दिलीप भोईर यांच्यासह 25 जणांवर गून्हा दाखल केला होता. तपास पूर्ण करुन या प्रकरणी दोषारोप पत्र येथील जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.
15 साक्षिदारांच्या साक्षी न्यायालयात ठरल्या महत्वाच्या
या खटल्यात न्यायालयात फिर्यादी रुपाली विजय थळे, त्यांचे पती विजय थळे, जखमी साक्षिदार मनिषा घरत, पंच प्रसाद गायकवाड, जखमींवर उपचार करणाऱ्या डॉ.निषा तेली, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक संजय केदारे यांच्या सह एकूण 15 जणांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्याचे या खटल्यातील विशेष सरकारी अभियोक्ता ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगीतले.
सर्वच राजकीय पक्षांचे निकालाकडे लक्ष लागून राहीले होते
रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापतीपदावर असताना दिलिप भोईर हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. त्यामुळे त्यावेळी देखील राजकीय आरोपप्रत्यारोप विरोधकांकडून करण्यात आले होते. दरम्यान गेल्या 12 वर्षांतील अलिबागमधील राजकीय घडामोंडींमध्ये दिलिप भोईर यांनी शेतकरी कामगार पक्षास रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतू विधानसभा निवडणूकीच्या वेळी बंडखोरी करुन भाजपा-सेनेचे अधिकृत उमेदवारा महेंद्र दळवी यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे त्यांना भाजपाने पक्षातून सहा वर्षाकरिता निलंबीत केले.
अखेर त्यांनी भाजपाला रामराम ठोकून अलिबागचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांचे नेतृत्वम्ान्य करुन शिवसेनेत प्रवेश केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर या खटल्याच्या निकाला कडे रायगड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहाले होत.
दरम्यान राजकीय दृष्ट्या अंत्यत संवेदनशील अशा या खटल्याच्या निकालावेळी कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरिता न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाने निकाल सूनावल्यावर आरोपींच्या दंड भरण्याच्या प्रक्रीयेनंतर सर्व म्हणजे 21आरोपींची तत्काळ येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा निकाल लागल्याने याचा मोठा राजकीय परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिक्षा झालेले आरोपी
दिलीप उर्फ छोटमशेठ विठठल भोईर
विक्रम वामन साळुंखे
विक्रांत विश्वनाथ कूडतरकर
मकरंद रविंद्र भोईर
विकेश वसंत ठक्कर
भरत अभिमन्यू खळगे
गणेश रमेश म्हात्रे
संतोष वामन साळुंखे
सज्जाद शगीर मूल्ला
गणेश बळीराम भोईर
विवेक विश्वनाथ कूडतरकर
शिशिर शंकर म्हात्रे.
हेमंत अनंत केळकर
जयवंत शामराव साळुंखे
विरेश रमेश खेडेकर
प्रभाकर रामचंद्र गवाणकर
प्रसाद दत्ता शिवदे
अशोक शांताराम थळे
मनोज जगन्नाथ थळे
राजेंद्र काशिनाथ ठाकूर
21.विजय राजाराम ठाकूर.
न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले आरोपी
नितेश सुनिल गुरव, सूजित सदानंद माने ,गणेश सोपान साळुंखे ,उमेश शांताराम खेडेकर