MHADA Mill Workers Housing : कोन, पनवेलमधील घरांच्या ताब्यासाठी १,०५१ विजेते

गिरणी कामगार-वारस पुढे आलेच नाहीत; प्रतीक्षा यादीबाबत लवकरच निर्णय
MHADA Mill Workers Housing
MHADA Mill Workers Housingpudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : म्हाडाच्या मुंबई मंडळाने एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांसाठी कोन, पनवेल येथील २,४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढली होती. या सोडतीतील साडेबारा हजार नव्हे, तर साडेबाराशेहून अधिक विजेत्यांनी घरांचा ताबा घेतला आहे. मात्र, दुसरीकडे १,०८६ विजेते कामगार-वारस घरांचा ताबा घेण्यासाठी पुढे आलेच नसल्याचे दिसून आले आहे.

काहींनी यासाठी असलेली आवश्यक कागदपत्रे जमा केलेली नाहीत, तर काहींनी हीं घराची रक्कमही भरलेली नाही. अशा कामगार-वारसांना अनेकदा संधी देऊनही ते पुढे येत नसल्याने मुंबई मंडळाने शेवटची संधी म्हणून ३ नोव्हेंबरपर्यंत घराचा ताबा घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत दिली होती. या मुदतीत १,०८६ पैकी केवळ ३५ कामगार-वारसांनी अर्ज सादर करून घराचा ताबा घेण्याची तयारी दर्शवली आहे. उर्वरित १,०५१ विजेते पुढे आलेले नाहीत. त्यामुळे या कामगार-वारसांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.

MHADA Mill Workers Housing
Mahadev Online Betting Scam : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी सीबीआयचे छापे

गिरणी कामगारांसाठी मुंबईत पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने राज्य सरकारने एमएमआरडीएच्या भाडे तत्त्वावरील गृहप्रकल्पातील ५० टक्के घरे गिरणी कामगारांसाठी आरक्षित ठेवली आहेत. मुंबई मंडळाने कोन, पनवेल येथील २,४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढली होती. या सोडतीतील पात्र विजेत्यांना २०२४ पासून घरांचा ताबा देण्यास सुरुवात झाली.

२०२४पासून आतापर्यंत २,४१७ पैकी १,२५१ विजेत्यांनी प्रत्यक्ष घरांचा ताबा घेतला असून अंदाजे ८० विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर १,०८६ विजेत्या कामगार-वारसांनी घरांचा ताबा घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यातील ५०० ते ६०० जणांनी आवश्यक कागदपत्रेच जमा केलेली नाहीत.

MHADA Mill Workers Housing
Ganesh Naik : राज्यावर ११ लाख कोटींचे कर्ज

काहींनी हीं कागदपत्रे जमा केली असली, तरी घराचा ताबा घेण्याची प्रक्रियाच सुरू केलेली नाही. तर काहींनी हीं घराची रक्कमही भरलेली नाही. अशा गिरणी कामगार-वारसांना मुंबई मंडळाने मागील एक ते दीड वर्षात घराची प्रक्रिया सुरू करण्यासाठी वारंवार संधी दिली आहे. मात्र, त्यानंतरही १,०८६ विजेते पुढे आलेले नाहीत.

घरे रिकामी पडून...

विजेते पुढे येत नसल्याने घरे रिकामी पडून आहेत आणि प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांची प्रतीक्षाही लांबत आहे. या पार्श्वभूमीवर अखेर मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी या विजेत्यांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ ऑक्टोबरला १,०८६ विजेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या विजेत्यांनी २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान घरांचा ताबा घेण्यासाठी पुढे यावे आणि अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले होते.

या मुदतीत जे विजेते अर्ज करणार नाहीत किंवा ताबा घेण्यासाठी पुढे येणार नाहीत, त्यांना घर घेण्यास स्वारस्य नसल्याचे गृहीत धरून त्यांची सदनिका रद्द करण्यात येईल आणि प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाईल, असे जाहीर निवेदन मंडळाने वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले होते. या अखेरच्या संधीनंतरही १,०५१ विजेते पुढे आले नसल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. ३ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३५ विजेत्यांनी घराचा ताबा घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता उर्वरित १,०५१ विजेत्यांबाबत वरिष्ठांकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.