Mahadev Online Betting Scam : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी सीबीआयचे छापे

मुंबईसह १३ शहरांत कारवाई; ६ राज्यांतील ३३ ठिकाणे लक्ष्य, मोबाइल फोन, डिजिटल उपकरणे जप्त
Mahadev Online Betting Scam
Mahadev Online Betting Scampudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशव्यापी कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबईसह देशातील १३ शहरांमध्ये ३३ ठिकाणी छापे टाकून बेकायदा ऑनलाइन सट्टेबाजीचे जाळे उघडकीस आणण्यात आले. या कारवाईत अनेक ठिकाणी सुरू असलेले लाइव्ह बेटिंग आणि जुगाराचे पॅनेल आढळले. सीबीआयने ही पॅनेल उद्ध्वस्त केली असून, मोबाइल फोन, डिजिटल उपकरणे आणि गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

अमृतसर, दिल्ली, नागौर, धौलपूर, भोपाळ, रायपूर, दुर्ग, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, मुंबई आणि नागपूर या शहरांमध्ये ही छापेमारी करण्यात आली. महादेव ऑनलाइन बुक अ‍ॅपचा प्रमुख प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सीबीआयने शनिवारी स्पष्ट केले.

Mahadev Online Betting Scam
Mumbai Home Sales : यंदाच्या दिवाळीत गृहखरेदीचा उत्साह

सौरभ चंद्राकरच्या चौकशीतून नेटवर्कचा उलगडा

सौरभ चंद्राकर याला ओमानमधून प्रत्यार्पण करून भारतात आणल्यानंतर सीबीआयने १ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक केली होती. रायपूर येथील सीबीआय प्रकरणांच्या विशेष न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या काळात झालेल्या चौकशीत महादेव अ‍ॅपचे कामकाज, भारतातील पॅनेल ऑपरेटर आणि त्यांच्या माध्यमातून चालणाऱ्या आर्थिक व्यवहारांचे जाळे समोर आले.

चौकशीदरम्यान चंद्राकरला तपास यंत्रणांनी आतापर्यंत गोळा केलेल्या कागदपत्रे आणि डिजिटल पुराव्यांबाबतही विचारणा केली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध शहरांतील पॅनेल ऑपरेटरच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

१९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सौरभ चंद्राकरची आठ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी त्याला रायपूर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Mahadev Online Betting Scam
Indian Railways RAC Ticket : रेल्वेकडून 'आरएसी' सुविधा बंदच्या हालचाली

महादेव ऑनलाइन बुक अ‍ॅपप्रकरणी छत्तीसगड सरकारकडून तपास हस्तांतरित झाल्यानंतर सीबीआयने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात परदेशात असलेले अन्य आरोपी, बेटिंग नेटवर्कला मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे. फरार आरोपींना भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असल्याचेही सीबीआयकडून सांगण्यात येते.

म्यूल खात्यांतून पैसे जमा; हवाला मार्गाने परदेशात हस्तांतरण

  • सीबीआयच्या तपासानुसार, महादेव ऑनलाइन बुक अ‍ॅपचे मुख्यालय परदेशातून चालविले जात होते, तर भारतात पॅनेल ऑपरेटरचे मोठे जाळे कार्यरत होते. हे ऑपरेटर ग्राहकांचे बेटिंग आयडी हाताळणे आणि सट्टेबाजीचे व्यवहार करण्याची जबाबदारी सांभाळत होते.

  • बेटिंगमधून जमा होणारी रक्कम अन्य व्यक्तींच्या नावाने उघडलेल्या किंवा भाड्याने घेतलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात होती. अशा खात्यांचा वापर करून आर्थिक व्यवहार केले जात होते. बेटिंगमधून मिळणारा नफा हवाला मार्गाने परदेशात पाठविला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.