

ठाणे : अनुपमा गुंडे
काही मोजके चित्रपट सोडले, तर मराठी चित्रपटांना मल्टीफ्लेस थिएटरमध्ये प्राईम शो मिळविण्यासाठी झगडा करावा लागतो आहे. हिंदी, इंग्रजी आणि दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाल्यास हमखास मराठी चित्रपटाच्या प्राईम टाईम शो वर गडांतर येते आहे. मराठी चित्रपटांना अशावेळी मल्टीफ्लेक्स चालकांकडून सापत्न भावाची वागणूक दिली जाते, अशा तक्रारी डोके वर काढत आहेत.
महानगरांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या मल्टीफ्लेक्समध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांना कमी स्क्रीन्स तसेच त्यांना कोणतीही माहिती न देता दोन-तीन दिवसांत चित्रपट उतरवणे, आठवड्याभराचे शुल्क घेऊन उर्वरित रक्कम परत न करणे, शोच्या वेळा ऐनवेळी बदलणे अथवा रद्द करणे, असे प्रकार आजही घडत आहेत.
मराठी चित्रपटांना न्याय मिळावा, यासाठी राज्य शासनाने विशेष समितीही स्थापन केली आहे, मात्र तरीही मराठी निर्मात्यापुढे आजही या अडचणी येत आहे. ठाण्यात गेल्या आठवड्यात मल्टीफ्लेसमध्ये भूतम भयम या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नव्हता, तसेच काही ठिकाणी दोन दिवस हा चित्रपट दाखवून शो बंद केल्याची तक्रार कलाकारांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार केळकर आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर या चित्रपटाला प्राईम शो मिळाले.
मराठी चित्रपटांवर प्राईम शो बाबत अन्याय झाल्यास अनेकदा निर्माते व दिग्दर्शकांना राजकीय आश्रय घ्यावा लागतो, त्यामुळे मराठी चित्रपटांना प्राईम शो मिळण्यासाठी कायमस्वरूपी व कडक नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी राजकीय आणि शासनाच्या इच्छाशक्तीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मराठी चित्रपटांना आजही हिंदी चित्रपटांशीच स्पर्धा करावी लागत आहे. तरुण वर्ग आणि महानगरांमध्ये आजही मराठी प्रेक्षक हिंदीला प्राधान्य देतो. मराठी चित्रपटाचा खरा प्रेक्षक वर्ग ग्रामीण भागात आहे, त्यात एकपडदा चित्रपटगृहांची संख्या घटली आहे. शासनाने मल्टीफ्लेक्सवाल्यांना वर्षभरात मराठी चित्रपटांचे शो दाखविण्याची अट घातली आहे; मात्र मराठीत एखादा मराठी चित्रपट हिट झाला, तर त्यात शो दाखविण्याचे मल्टीफ्लेक्सवाल्यांच्या दृष्टीने शासनाच्या नियमाची पूर्तता होते, त्यामुळे मल्टीफ्लेस चालक नियमात अडकत नाही, त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी वेगळे स्क्रीन राखून ठेवणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात तालुका पातळीवर छोटे - छोटे चित्रपटगृह उभे करावेत, शासनाने असे चित्रपटगृह उभारण्यासाठी जागा दिल्यास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ती जबाबदारी उचलण्यास तयार आहे.
मेघराज भोसले, अध्यक्ष -अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
भूतम भयम चित्रपट थिएटरमध्ये असताना स्पायडर मॅन हा जागतिक चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी आमच्या चित्रपटासाठी सकाळी ८ आणि रात्री ११.३० चे शो देण्यात आले, या दोन्ही वेळात चित्रपट प्रेक्षक बघायला येतील का, याचा विचार करण्याची गरज आहे. नियमाप्रमाणे मराठी चित्रपटांना प्राईम शो द्यावेतच, कारण या शो च्या काळात होणारी कमाई ही मराठी चित्रपटांसाठी महत्त्वाची आहे. पण जागतिक पातळीवर प्रदर्शित होणारे चित्रपटही त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतील, पण मराठी प्रदेशात मराठी चित्रपटही महत्त्वाचे आहे, त्यामुळे दोन्हींचा समन्वय साधून ५० टक्के तरी प्राईम शो अशा बिग बजेट चित्रपटांच्या वेळी मराठी चित्रपटांना मिळालायच हवेत, त्यांच्यावर मोठ्या चित्रपटांसाठी अन्याय होता कामा नये.
रामचंद्र गावकर, दिग्दर्शक -भूतम भयम