Thane News : उद्घाटनाचा गाजावाजा, पण आरोग्य केंद्र गवताच्या विळख्यात

मांडा-टिटवाळ्यातील आरोग्य मंदिराची दुरवस्था; नागरिकांना सेवा कधी मिळणार?
Manda Titwala health centre
Manda Titwala health centrepudhari photo
Published on: 
Updated on: 

टिटवाळा : अजय शेलार

मांडा-टिटवाळा परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि मोफत प्राथमिक आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने मोठ्या गाजावाजात भूमिपूजन करण्यात आलेल्या आरोग्य मंदिरा’ची (केंद्राची) सध्याची अवस्था पाहिल्यानंतर उद्घाटन झाले, पण आरोग्यसेवा कुठे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

एकीकडे भूमिपूजनाच्या वेळी विकासाचे दावे, आरोग्यसेवेचे आश्वासन आणि नागरिकांच्या सुविधांची मोठमोठी चर्चा करण्यात आली होती; मात्र आज त्याच ठिकाणी उगवलेले गुडघाभर गवत, वाढलेली झाडाझुडपे, बंद अवस्थेतील शटर आणि आजूबाजूचा अस्ताव्यस्त घाणीने व्यापलेला परिसर या संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.

Manda Titwala health centre
Kalyan RTO encroachment : दहा कोटींचे कार्यालय, वाहन प्रशिक्षण चाचण्या मात्र रस्त्यावरच

मांडा-टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य केंद्र उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गेल्यावर्षी २ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक उपचार, आरोग्य तपासण्या आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळेल, तसेच किरकोळ आजारांसाठी नागरिकांना दूर जावे लागणार नाही, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमातील उत्साह आणि त्यावेळी करण्यात आलेल्या घोषणांनंतर नागरिकांच्या अपेक्षा साहजिकच वाढल्या होत्या. मात्र आता समोर आलेले चित्र वेगळेच आहे. आरोग्य केंद्राची इमारत उभी असली तरी त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडाझुडपे वाढलेली दिसत आहेत. इमारतीचे शटर बंद आहे. खिडक्यांभोवतीही अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे हे केंद्र प्रत्यक्षात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू झाले आहे का, असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित होत आहे.

Manda Titwala health centre
Drug destruction : नवी मुंबईत २६.३० कोटींचे ७२६ किलो अमली पदार्थ नष्ट

विशेष म्हणजे या इमारतीवर संबंधित आरोग्य केंद्राच्या इमारतीचा फलक झळकत आहे. केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक उपक्रमाचा भाग म्हणून अशा केंद्रांकडून प्राथमिक आरोग्यसेवा नागरिकांच्या जवळ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आहे. परंतु केवळ फलक लावून किंवा इमारत उभी करून आरोग्यसेवा उपलब्ध होत नाही. त्यासाठी नियमित कर्मचारी, डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी, आवश्यक तपासणी सुविधा, औषधसाठा, स्वच्छता आणि नागरिकांसाठी निश्चित वेळेत सेवा उपलब्ध असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

मांडा-टिटवाळ्यासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या परिसरात आरोग्यसेवेची गरज मोठी आहे. नव्या गृहसंकुलांमुळे वाढलेली लोकसंख्या, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि सर्वसामान्य कुटुंबांना स्थानिक पातळीवर प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. त्यामुळे अशा केंद्राची घोषणा झाल्यानंतर नागरिकांना प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची अपेक्षा असते. मात्र सध्याचे दृश्य त्या अपेक्षांशी विसंगत असल्याचे दिसते. सदरचे आरोग्य केंद्र हे गवताच्या विळख्‍यात अडकल्याचे दिसून येत आहे.

Manda Titwala health centre
Dombivli liquor smuggling : दिव-दमणची दारू गुजरातला तस्करी करण्याचा डाव उधळला

प्रवास नेमका कुठे अडला?

या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले, इमारत उभी राहिली, फलकही लागला. मात्र त्यानंतर पुढील प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत पोहोचली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्र पूर्णपणे कार्यान्वित झाले आहे का? झाले नसेल तर विलंबाचे कारण काय? केंद्र सुरू करण्यासाठी कोणत्या विभागाची जबाबदारी आहे? येथे वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी नियुक्त झाले आहेत का? औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत का? नागरिकांसाठी ओपीडीची वेळ निश्चित झाली आहे का? या प्रश्नांची उत्तरे संबंधित प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांसमोर स्पष्ट करणे गरजेचे आहे. कारण आरोग्य केंद्राचा प्रश्न हा केवळ एखाद्या इमारतीचा किंवा विकासकामाचा प्रश्न नाही. हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन झाल्यानंतर त्याचा पुढील टप्पा पूर्ण होऊन नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळणे अधिक महत्त्वाचे ठरते.

आरोग्यसेवेचे स्वप्न दाखवले...

मांडा-टिटवाळ्यातील या आरोग्य केंद्राच्या बाबतीतही आता त्याच कसोटीची वेळ आली आहे. भूमिपूजनाच्या वेळी ज्यांच्यासमोर आरोग्यसेवेचे स्वप्न दाखवण्यात आले, त्या नागरिकांना आता केवळ बंद शटर आणि वाढलेले गवत नको; त्यांना प्रत्यक्ष डॉक्टर, औषधे आणि आरोग्यसेवा हवी आहे. त्यामुळे संबंधित महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या केंद्राच्या सद्यस्थितीबाबत स्पष्ट माहिती देऊन ते नागरिकांसाठी प्रत्यक्ष कधी सुरू होणार, याची तारीख जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांना विचारणा केली असता याबाबतची माहिती घेऊन कळविण्‍यात येईल, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news