

डोंबिवली : तब्बल १० कोटी ४६ लाख रुपये खर्च करून शासनाने उभारलेल्या कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तीन एकर जागेवर अतिक्रमणे झाली आहेत आणि जागा अपुरी असल्याने वाहन चालवण्याच्या चाचण्या रस्त्यावर घेतल्या जात असल्याचे धक्कादायक उत्तर परिवहन कार्यालयाने दिल्याने हा प्रकार नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या जागेचा गैरवापर असून प्रशासनाने तातडीने अतिक्रमणे हटवून हक्काच्या आवारातच चाचण्या घ्याव्यात, अशी मागणी वाहन प्रशिक्षण संस्थेच्या संगीता माळेकर यांनी केली आहे.
या संदर्भात संगीता माळेकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना स्मरणपत्र तसेच निषेध पत्र सादर केले. संगीता यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले की, १० ऑगस्ट रोजी या विषयावर पहिले निवेदन दिले होते. त्याला उत्तर देताना कार्यालयाने २४ सप्टेंबरच्या पत्रात कबूल केले आहे की ३ एकर पैकी ८२२० चौ. मीटर जागेवर बांधकाम असून उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे आणि जागा अपुरी आहे म्हणून रस्त्यावर चाचण्या घेतल्या जातात. हे उत्तर अत्यंत धक्कादायक असल्याचे संगीता माळेकर यांनी म्हटले आहे.
शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या सुसज्ज कार्यालयाच्या ३ एकर जागेचे संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. परिवहन कार्यालयानेच आपल्या पत्रात कबूल केले आहे की, त्यांच्या मालकीच्या जागेवर स्थानिकांकडून अतिक्रमण झाले आहे. ही जागा नागरिकांच्या सोयीसाठी आहे अतिक्रमण करणाऱ्यांसाठी नाही. परिवहन प्रशासन जर अतिक्रमण काढणार नाही तर मग कोण काढणार? असा थेट सवाल करण्यात आला आहे.
कार्यालयाने आपल्या पत्रात असेही नमूद केले आहे की, नांदिवली येथे स्वयंचलित चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. ही बाब उत्तम असली तरी हा मार्ग तयार होण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षे लागतील हे वास्तव आहे. तोपर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, टिटवाळा परिसरातील हजारो महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांनी उन्हा-पावसात रस्त्यावर उघड्यावर ताटकळत रहायचे का? असा संतप्त सवाल संगीता माळेकर यांनी केला आहे.
लोकशाही मार्गाने आंदोलन करणार...
या साऱ्या पार्श्वभूमीवर वाहन प्रशिक्षक संगीता माळेकर यांनी प्रशासनाला दोन पर्याय सुचवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे आपल्या ३ एकर जागेवरील अतिक्रमण तत्काळ हटवून त्या आवारातच वाहन चालवण्याच्या चाचण्या घेण्यास सुरुवात करावी. दुसरा पर्याय म्हणजे जर अतिक्रमण तत्काळ काढणे शक्य नसेल तर जोपर्यंत नांदिवलीचा स्वयंचलित मार्ग तयार होत नाही, तोपर्यंत सध्या जिथे उघड्यावर चाचण्या घेतल्या जातात त्या ठिकाणी नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याची, फिरत्या स्वच्छतागृहाची आणि बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था प्रशासनाने करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असाही इशारा वाहन प्रशिक्षक संगीता माळेकर यांनी त्यांच्या निवेदनातून दिला आहे. या निवेदनाची प्रत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह परिवहन आयुक्त आणि ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांही पाठविण्यात आली आहे.