

भिवंडी : महाराष्ट्र राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन केल्यास मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक डॉ. महेश पालकर यांनी मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारल्यास अशा कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.
तसेच मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा बंद ठेवू नयेत याबाबत दक्षता घेण्याचे आवाहनही संचालकांनी संबंधित विभागांसह राज्यातील शाळांना केले आहे. त्यानुषंगाने शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती, माजी आ. दत्तात्रेय सावंत व राज्य शिक्षण संस्था महामंडळामार्फत 1 डिसेंबरला निवेदन सादर करून विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पालकर यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांना सूचित करण्याचे आदेश दिले आहेत.
संच मान्यता व टीईटी संदर्भातील अयोग्य निर्णयांवर मार्ग काढण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने शिक्षकांमधील असंतोष वाढतच जाणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची भूमिका शिक्षण क्रांती संघटनेची कायम राहिली आहे. शासनाने तातडीने संच मान्यता पूर्ववत करावी व 2013 पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्यावी.
सुधीर देवराम घागस, राज्य अध्यक्ष, शिक्षण क्रांती संघटना