कांदिवली : कांदिवली पश्चिमेला चारकोप सेक्टर 1 व 5 मध्ये तसेच सेक्टर 4 मधील मुख्य मार्गावर अनधिकृत व्यावसायिक आणि भाजी विक्रेत्यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांच्या हातगाड्यांनी पदपथासह अर्धा रस्ता गिळंकृत केला आहे.
परिणामी, वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच वाहनांच्या कोंडीतून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांसह पादचारी प्रचंड हैराण झाले आहेत.
कांदिवली पश्चिमेला म्हाडाची मोठी वसाहत आहे. सेक्टर 1,2 व 5 मधील काडसिद्धेश्वर मार्ग तसेच सेक्टर 4 मधील वीर सावरकर या दोन्हीही मुख्य मार्गांवर, मालाड मालवणी येथील अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. विशेष म्हणजे पदपथ आणि मार्गांवर भाजी, फळे, इतर वस्तू आणि कपड्यांचा बाजार मांडला आहे.
रस्त्यावर दुहेरी हातगाड्या लागत असल्याने अर्धाधिक मुख्य मार्ग व्यापला आहे. यामुळे मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होते. प्रवाशांना या कोंडीतूनच मार्ग काढावा लागतो. वरंवार तक्रारी केल्यावर पालिकेकडून थातूर-मातूर कारवाई करण्यात येते. मात्र, दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तीच परिस्थिती होत असल्याने वाहनचालक आणि पादचारी मेटाकुटीला आले आहेत.
बस थांबेही गायब
बस थांब्यांच्या आजूबाजूच्या जागेत देखील फेरीवाले व्यवसाय करत असल्याने बस थांबे देखील दिसतच नाहीत. प्रवाशांना बसची वाट पाहत रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. प्रवासी रस्त्यावर उभे राहत असल्याने बसचालक रस्त्याच्या मधोमध बस उभी करतात, यामुळे मागील वाहनांची कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागतात. यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.