

ठाणे : भाडे तत्त्वावरील घरांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने आता पुढाकार घेतला आहे. यासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी म्हाडा स्वतंत्र धोरण तयार करणार असून म्हाडाच्या या धोरणानुसार गृहप्रकल्पातून आणि पुनर्विकासातून ज्या घरांची निर्मिती होणार आहे. त्यातील काही घरे ही भाडेतत्वार राखीव ठेवण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना म्हाडाच्या लॉटरीमधून घरे लागणार नाही त्या नागरिकांना भाडेतत्वारील घरे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आपले स्वतःचे हक्काचे घर असावे, असे सर्वांचेच स्वप्न असते. मात्र प्रत्येकालाच स्वतःचे घर घेणे परवडत नाही. याशिवाय भाड्याने घर घेणे देखील काही लोकांना कठीण जाते. भाड्याने आणि आपल्याला परवडेल अशा ठिकाणी भाड्याने घर मिळेल याची शाश्वती देखील नसते. यासाठी आता राज्य सरकारनेच भाडेतत्त्वावरील घरांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून म्हाडाने एक मसुदा तयार केला आहे.
या मसुद्याप्रमाणे जी गृहप्रकल्पांची कामे सुरु आहेत तसेच ज्या ठिकाणी पुनर्विकास सुरु आहे त्यातून जी काही घरांची निर्मिती होणार आहे.या घरांपैकी काही घरे ही भाडेतत्वारील घरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मात्र भाडेतत्वासाठी किती टक्के घरे ही राखीव ठेवण्यात येणार आहे, हे म्हाडाच्या मसुद्यामध्ये अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. याचा निर्णय म्हाडा स्वतंत्रपणे घेणार असल्याचे समजते.
घरामुळे ‘घरघर’ कमी होणार
मुंबईसह संपूर्ण राज्यात गृहनिर्माणाचे प्रकल्प सुरु असले तरी नव्याने निर्माण होणारी ही घरे नागरिकांना परवडतीलच असे नाही. सध्या नवीन घरांच्या किंमती देखील वाढल्या असल्याने प्रत्येकालाच घर घेणे परवडत नाही. याशिवाय म्हाडाच्या लॉटरीमधून निघणारी घराची सोडत यामध्ये प्रत्येकालाच घर लागेल याची शाश्वती देखील नसते. त्यामुळे ज्या नागरिकांना लॉटरीमधून म्हाडाची घरे उपलब्ध होणार नाही, त्या नागरिकांसाठी आता म्हाडाच्याच वतीने भाडेतत्वारील घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोठ्या प्रमाणात घरांच्या निर्मितीची आवश्यकता
मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असून नागरिकांचे स्थलांतर देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात घरांच्या निर्मितीची देखील आवश्यकता निर्माण झाली असून प्रत्येकालाच स्वतःचे घर घेणे परवडेलच असे नाही. परिणामी आता अशा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आता म्हाडाच्या वतीनेच भाडेतत्त्वावरील घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.