

नालासोपारा : मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना अक्षरशः वेब सिरीजबाहेरची थरारक कथा आहे. ऑनलाईन डेटिंग ऍपवर ‘हॅपन’मार्फत मैत्री करून तरुणांना जाळ्यात ओढून, गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या दोन महिलांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे.
31 वर्षीय तरुणाची एका मुलीसोबत ऑनलाईन ओळख झाली. दोघे 22 नोव्हेंबरला रात्री मांडवीतील एका लॉजवर भेटले. पण ‘डेट’ला तिसरी मुलगीही सोबत आली. तिघे मिळून दारू घेत असताना तरुणाला अचानक प्रचंड झोप आली आणि तो बेशुद्ध झाला. सकाळी 8 वाजता जाग आली, तर गळ्यातील 2 तोळ्यांची सोन्याची चेन मोबाईल फोन स्मार्ट वॉच अशी तब्बल 1,83,000 ची मालमत्ता लूटून त्या पसरा झाल्या.
23 नोव्हेंबरला याच दोघींनी दुसऱ्या तरुणाबरोबरही हाच खेळ खेळला. पुन्हा लॉजवर बोलावलं, पुन्हा ड्रिंक आणि पुन्हा चोरी! याबाबत काशिमिरा पोलिसातही गुन्हा नोंद झाला होता. कोणताही ठोस पुरावा नसतानाही मांडवी पोलीस टीमने लॉजचे अंधुक सीसीटीव्ही फ्रेम्स, आजूबाजूच्या भागातील कॅमेरे तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे संशयितांची ओळख पटवली. केवळ 48 तासांत मुंबईच्या मालाड परिसरातून मांडवी गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोघींना ताब्यात घेतले आहे.
दोन्ही गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांनी सोन्याचे दागिने, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 4,13,000 चा मुद्देमाल जप्त केला आहे. अनोळखी व्यक्तीला भेटताना आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक आंधळे यांनी केले आहे.
या दोन महिलांच्या अटकेनंतर मीरा भाईंदर, वसई, विरार शहरातील अनेक तक्रार येत आहेत. अशाच प्रकारे तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात सहा तोळे ब्रेसलेट व दोन ब्रॅण्डेड कंपनीचे मोबाईल असा एकूण आठ लाखाचा मुद्देमाल ताब्यात असलेल्या या दोन महिलांनी केल्याचे मांडवी पोलिसांनी उघड केले आहे.