

ठाणे : ॲप-आधारित टॅक्सी सेवांमधून प्रवाशांकडून अतिरिक्त टिप किंवा जादा रकमेची सक्ती केल्याच्या तक्रारी वाढत असताना राज्य परिवहन विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित कंपन्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर आल्या होत्या. प्रवास बुक झाल्यानंतर अतिरिक्त रक्कम किंवा टिपची मागणी करणे, ती न मिळाल्यास प्रवास रद्द करणे, तसेच प्रवाशांना मानसिक त्रास देणे अशा प्रकारांमुळे नाराजी व्यक्त होत होती. विशेषतः गर्दीच्या वेळेत किंवा अत्यावश्यक प्रवासादरम्यान ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा सामाजिक माध्यमांवरही होत होती.
या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली होती. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी परिवहन विभागाकडून नव्या ॲग्रीगेटर धोरणाची तयारी सुरू असून ग्राहकांच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजनांवर विचार सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
प्रवाशांकडून स्वेच्छेने दिली जाणारी टिप आणि दबाव टाकून वसूल केली जाणारी अतिरिक्त रक्कम यामध्ये स्पष्ट फरक असल्याचे मत ग्राहक संघटनांकडून व्यक्त केले जात आहे. ग्राहकांना सुरक्षित, पारदर्शक आणि न्याय्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क असून अशा तक्रारींवर प्रभावी कारवाईची मागणी सातत्याने होत आहे.आता संबंधित कंपन्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी होणार आहे.
प्रवाशांच्या नेमक्या तक्रारी काय?
प्रवास स्वीकारल्यानंतर अतिरिक्त टिप किंवा रोख रकमेची मागणी
मागणी न मानल्यास प्रवास रद्द करणे
गर्दीच्या किंवा अत्यावश्यक वेळेत जादा पैसे देण्यासाठी दबाव
ॲपवरील भाड्याव्यतिरिक्त रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न
ग्राहकांना मानसिक त्रास आणि असुविधा