

कणकवली : ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसवू नका, असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना महावितरणकडून परस्पर स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. हे स्मार्ट मीटर ग्राहकांवर अन्यायकारक असून स्मार्ट मीटरची सक्ती महावितरणला करता येणार नाही. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल थकलं की वीजपुरवठा लगेच खंडीत होतो, मग ही तप्तरता ग्राहकांचे प्रलंबित प्रश्न सोडविताना का दिसत नाही? असा सवाल करत वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना पदाधिकारी तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संदीप पाटील यांना जाब विचारला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना आणि तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या पुढाकारातून कणकवलीत महावितरण कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ‘गरमागरम चाय पे चर्चा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र कार्यकारी अभियंता विशाल माळी हे रजेवर असल्याने उपकार्यकारी अभियंता संदीप पाटील चर्चेला सामोरे गेले. यावेळी देवगड, आचरा उपकार्यकारी अभियंता राहुल लिमकर, मालवण उपविभाग उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे, कणकवली शहर सहा. अभियंता ओंकार स्वामी उपस्थित होते. तर वीज ग्राहक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, संतोष नाईक, गुरूनाथ कुलकर्णी, कणकवली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर, विलास कोरगावकर, बाळू मेस्त्री, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, काँग्रेस महिलाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, पं.स. सदस्य सहदेव खाडये, अनूप वारंग, विलास गुडेकर, स्वप्निल चिंदरकर, सिध्देश रावराणे, धिरज मेस्त्री, तारकेश सावंत, सुशांत राऊळ, नितीन पेडणेकर, प्रणय बांदिवडेकर, शांताराम नेवरेकर, रंजन चिके, एस. बी. बांदेकर, पंकज चिंदरकर आदी उपस्थित होते.
नंदन वेंगुर्लेकर यांच्यासह अनेकांनी पावसाळा सुरू झाला नाही तरी मागील काही दिवसांत अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता, मग प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाल्यानंतर काय अवस्था होईल, याचा विचार करा, असे अधिकाऱ्यांना सुनावले. कलमठमध्ये अनेक भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने स्वतंत्र फिडरची मागणी केली होती, त्यावेळी आठ दिवसांत फिडर बसवण्याचे आश्वासन देवूनही त्याची पूर्तता केली नसल्याकडे सरपंच संदीप मेस्त्री यांनी लक्ष वेधले. या वर अभियंता श्री. पाटील यांनी अंडरग्राऊड केबल टाकण्याचे काम सुरू असून फिडरचे काम पूर्ण व्हायला दीड-दोन महिने लागतील असे सांगितले. सरपंच संदीप मेस्त्री, बाळू मेस्त्री, अनुप वारंग आदींनी त्यांना धारेवर धरले तर केबल टाकण्यासाठी महामार्ग प्राधिकरणच्या परवानगीला विलंब झाला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरपंच संदीप मेस्त्री यांनी आठ-दहा दिवसात फिडरचे काम करून देण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही असा इशारा दिला.
मार्च महिन्यात वील बिल वसूलीसाठी ग्राहकांना त्रास देता आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर वीज पुरवठा खंडीत होत असताना कार्यकारी अभियंता रजेवर जातात, ते ग्राहकांच्या प्रत्येक मिटींग टाळतात, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. देखभाल दुरूस्तीची कामे केवळ कागदावर पूर्ण असून प्रत्यक्षात अनेक कामे अपुर्ण आहेत. मधल्या काळात काहीसा पाऊस झाला तेव्हा ६५ टक्के जिल्हा अंधारात होता. असे श्री. वेंगुर्लेकर यांनी सांगितले. नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, कमी अधिक दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे. आपत्कालीन काळात महावितरणची यंत्रणा सक्षम करा, पूर्ण जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्या टाका, ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका अशा सूचना केल्या. उपकार्यकारी अभियंता श्री. पाटील यांनी ज्याठिकाणी मोबाईल नेटवर्क आहे तिथे स्मार्ट मीटर बसविण्याचे परिपत्रक आल्याचे सांगितले. यावर नंदन वेंगुर्लेकर यांच्यासह सर्वानीच जाब विचारत चुकीचे सर्क्युलर काढून ग्राहकांची फसवणूक करू नका, जिल्ह्यातील ५५ हजार ग्राहकांनी यावर आक्षेप घेतले आहेत. जवळपास ३५० ग्राहक वीज आयोगाच्या बैठकीला उपस्थित होते. याकडेही त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
विध प्रश्नांबाबत प्रदीर्घ काळ चर्चा झाली. संदीप मेस्त्री यांनी पुढील आठ दिवसांनी कार्यकारी अभियंत्यांच्या उपस्थितीत फॉलोअप मिटींग घ्या, अशा सुचना केल्या. विलास कोरगावकर, संतोष नाईक यांनी शहरातील कमी दाबाच्या वीज पूरवठ्याकडे लक्ष वेधले असता संदीप पाटील यांनी नगराध्यक्षांशी चर्चा करून टान्स्फार्मरसाठी जागा उपलब्धतेबाबत मार्ग काढण्याची ग्वाही दिली. दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करा, वीज ग्राहकांचे प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा ग्राहक अधिक आक्रमक होतील असा इशारा सर्वांनीच वीज अभियंत्यांना दिल्या.