

भिवंडी : अतिवृष्टी पाठोपाठ अवकाळी आलेल्या पावसाने राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. भिवंडी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील तब्बल 9817 शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतजमिनींचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत खोले यांनी दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात भात पीक शेतात उभे असताना आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके आडवी झाली होती. त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे नियोजन केले जात असतानाच ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातपिकाचे नुकसान झाले. याचे पंचनामे तहसीलदार अभिजित खोले यांनी दिल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व ग्रामसेवक यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतजमिनींची पाहणी करून पंचनामे केले.
सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त व ऑक्टोबर महिन्यातील नुकसानग्रस्त 9,254 शेतकऱ्यांच्या 3016.5 हेक्टर शेतजमिनीचे पंचनामे केले होते. त्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे 2 कोटी 42 लाख 83 हजार 116 रुपये मंजूर केले गेले. ते परस्पर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातशेतीचे नुकसान झाले. त्यावेळी सुद्धा 9817 शेतकऱ्यांच्या 3856.47 हेक्टर शेतजमिनींचे पंचनामे करण्यात आले. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सुमारे 3 कोटी 30 लाख 80 हजार रुपयांची मागणी शासनाकडे महसूल प्रशासनाने केली आहे, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांत समाधान
अतिवृष्टी व अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुरुवातीला शेतातील उभी पिके आडवी झाली, तर अवकाळी पावसात शेतात कापून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हे पंचनामे केल्यानंतर मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.