

अलिबाग ः अतुल गुळवणी
रायगडात सुरु असलेल्या नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी जिल्ह्यातील दोन मंत्री,पाच आमदार आणि तीन खासदारांसाठी महत्वाची ठरणार असून,त्यावर आपल्याच पक्षांचे वर्चस्व राहण्यासाठी या नेतेमंडळींना कसरत करावी लागत आहे.विशेषतः खा.सुनील तटकरे आणि रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांना राजकीयदृष्ट्या आपले प्राबल्य वाढविण्यासाठी या नगरपालिका निवडणुकांकडे गांभीर्याने पहावे लागत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.या निवडणुकांवर आगामी जि.प,पं.स. निवडणुकीचा पेपर ठरणार आहे.
रायगडात अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, महाड, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली या नगरपालिकांच्या निवडणुका तब्बल चार वर्षांनी पार पडत आहेत.गेली चार वर्षे प्रशासकीय राजवटीमुळे या निवडणुका प्रलंबित होत राहिलेल्या आहेत.आता यावेळी निवडणुका होत असल्याने कार्यकर्त्यांचाउत्साह संचारलेला आहे.त्याचे पडसाद अर्ज भरताना दिसून आलेले आहेत.आता या सर्व नगरपालिकांवर कुणाची सत्ता येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाडमध्ये गोगावले यांच्या विरोधात राष्ट्रवादीने भाजपसमवेत युती केलेली आहे.त्यामुळे महाड जिंकणे हे तटकरे आणि गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. असाच प्रकार श्रीवर्धन, रोहा, कर्जत,खोपोलीमध्येही निर्माण झालेला आहे. तेथेही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच राजकीय सामना होणार असल्याने खा.सुनीत तटकरे विरुद्ध आ.महेंद्र थोरवे यांचा कस लागणार आहे.
कर्जतला भाजपने शिवसेनेला साथ दिली आहे तर खोपोलीत शिवसेना, भाजप,रिपाइं एकत्र आलेले आहेत.त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने ठाकरे शिवसेना आणि शेकाप यांची मोट बांधून विकास परिवर्तन आघाडी गठीत केलेली आहे.यामुळे येथेही थोरवे आणि तटकरे यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.माथेरानमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध महायुती असाच सामना होणार आहे.
अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेस यांची महाआघाडी आहे. त्या विरोधात शिवसेना,भाजप एकत्र आलेले आहेत. मात्र यामध्ये राष्ट्रवादीचा समावेश नाही. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. यामुळे येथे राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झालेला नाही. उरणला भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली आहे . त्या विरोधातशिवसेना आणि महाविकास आघाडीही मैदानात उतरलेली आहे. यामुळे येथे भाजपचे आम. महेश बालदी यांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.
रोह्यात खा.सुनील तटकरे विरोधात शिवसेना उभी ठाकली आहे. अशी स्थिती श्रीवर्धन, मुरुडला देखील आहे. एकूणच महायुतीच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदार संघातील नगरपालिकांवर सत्ता टिकविण्यासाठी झगडावे लागणार हे नक्की. तुर्तास तरी रायगडात ऐन थंडीत राजकीय वातावरण गरमागरम झालेले आहे.जसजसा प्रचार शिगेला पोहोचेल तसे आरोप होत राहणार आहेत.
राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई
रायगडात शिवसेनेचे तीन,भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचे 1 असे आमदार आहेत.तर शिवसेनेचा एक खासदार,राष्ट्रवादीचा एक आणि भाजपचाएक खासदार असे राजकीय संख्याबळ आहे. विशेष म्हणजे या तिन्ह पक्षांची राज्यात महायुती आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे रायगडात महायुतीला सर्वच ठिकाणी तडा गेल्याचे दिसून येत आहे.याचे पडसाद सर्वच नगरपालिकांमध्ये दिसून येऊ लागलेले आहेत.
विशेष करुन महाड, खोपोली, रोहे, श्रीवर्धन, कर्जत आदी ठिकाणी खा.सुनील तटकरे आणि रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. गेल्या काही महिन्यांत खा. सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे ना.भरत गोगावले, आ.महेंद्र थोरवे आणि आ.महेंद्र दळवी यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माणझालेले आहे.त्याचे पडसाद यावेळी नपा निवडणुकीत उमटताना दिसत आहेत.