मुंबई : दादर येथील कबुतरखाना बंद केल्यानंतर मुलुंड परिसरात कबुतरखान्याचा घाट घालणाऱ्या पालिकेविरोधात रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावत पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कारण देत पालिकेला शहरातील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. मात्र कबुतरांना खायला घालण्यास बंदी घातल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याने खाद्य घालण्यापासून रोखू नये अशी मागणी करत पल्लवी पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
या याचिकेची दखल घेत न्यायालयाने पालिका आयुक्तांनी जनतेकडून हरकती मागवून आणि सर्व भागधारकांचे म्हणणे ऐकून घेत कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुंबई महापालिकेने 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय घेतला. त्याकरीता मुंबई महापालिकेने चार नवीन जागाही उपलब्ध करून दिल्या. त्यापैकी मुलुंड पूर्व येथील जुना ऐरोली मुलुंड चेक नाका परिसरात खाडीजवळील जागेवर तात्पुरता कबुतरखाना सुरु करण्यास मुलुंडमधील रहिवाशांनी विरोध केला आहे. हा कबुतरखाना सुरू केल्यास फ्लेमिंगोंना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.