Leopard Accident : मुरबाड-कल्याण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

घटनेचा व्हीडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप
Leopard Accident
मुरबाड-कल्याण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठारpudhari photo
Published on
Updated on

टिटवाळा/मुरबाड शहर : कल्याण तालुक्यातील मुरबाड नगर महामार्गावर बापसई फाट्याजवळ शुक्रवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास भीषण अपघातात एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. पेट्रोल पंपाजवळील रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका पिकअप गाडीच्या जोरदार धडकेत हा अपघात झाला असून मृत प्राणी मादी बिबट्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बिबट्या अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकाला नियंत्रण ठेवता आले नाही आणि जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की बिबट्याने जागीच प्राण सोडले. घटनेनंतर काही वेळातच स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि परिस्थिती पाहून संताप व्यक्त केला.

Leopard Accident
Leopard clash: बिबट्यांच्या झुंजीत मादीचा मृत्यू

घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाचे अधिकारी तसेच विविध निसर्गप्रेमी संघटनांचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

कल्याणचे आरएफओ निलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी, वाइल्ड इंडिया 05 फाउंडेशनचे प्रवीण भालेराव, साहिल भवार, कृष्णकांत अहिरे तसेच आरएडब्लूडब्लू संस्थेचे साहिल सवादिया, हृतिक जैस्वाल, अमन सिंग, जय जोशी आदी रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याला ॲंबुलन्समधून कल्याण येथील वन विभाग कार्यालयात हलवण्यात आले असून पुढील शासकीय कार्यवाही तेथे पार पडणार असल्याचे समजते.

मुरबाड महामार्गालगत असलेल्या जंगल पट्ट्यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा वावर कायम असतो. मात्र, अशा संवेदनशील भागात वेगमर्यादा नियंत्रण, प्रकाशयोजना आणि चेतावणी फलकांचा अभाव असल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे. वन्यजीव संरक्षणाबाबत प्रशासन केवळ कागदोपत्री उपाययोजना करत असल्याचा आरोपही पुढे येत आहे.

Leopard Accident
Leopard attack: बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनखाते आणि स्थानिक पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली. मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढगे यांनी दिली आहे.

वन विभागावर सवालांची सरबत्ती

या घटनेनंतर वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित बिबट्या या भागात कधीपासून वावरत होता? तो अचानक रस्त्यावर कसा आला? त्याच्या अधिवासाबाबत वन विभागाला माहिती नव्हती का? या भागात वन्यजीवांची हालचाल सुरू असताना कोणतीही पूर्वतयारी किंवा इशारा व्यवस्था का नव्हती? अशा अनेक प्रश्नांनी स्थानिक नागरिक आणि प्रवासी संतप्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news